ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप नेत्या रुपा गांगुली यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात खळबळजनक आरोप केला आहे. सुशांतचे सोशल मिडिया अकाऊंट इतर कोणीतरी हाताळत होतं असं रुपा यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त आयएएनएसने दिलं आहे. रुपा गांगुली यांनी या पूर्वीही सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी केली होती. मात्र आता त्यांनी थेट सुशांतच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भातील पुरावे नष्ट करण्यासंदर्भात प्रयत्न सुरु असल्याचे आरोप केले आहेत. त्याचबरोबर रुपा गांगुली यांनी त्यांच्या ट्विटवरुनही काही ट्विट करत सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केलं आहेत.

सुशांतचे इन्स्टाग्राम अकाऊंट दुसऱ्या व्यक्तीकडून हाताळलं जातं होतं असा आरोप रुपा गांगुली यांनी केला आहे. त्याचप्रमाणे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने काही पोस्ट डिलीट करण्यात आल्याचा आरोपही रुपा यांनी केल्याचे आयएएनएसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रुपा यांनी सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, “सुशांतच्या अकाऊंटवरुन गोष्टी डिलीट होतायत अॅड होतातय. त्याचं अकाऊंट वापरलं जातयं. मला आधी विश्वास होत नव्हता मात्र मी स्वत: स्क्रीनशॉर्ट पाहिले आहेत. त्याचं अकाऊंट कोण हाताळत आहे? पोलीस की इतर कोणी? सर्व पुरावे नष्ट झाल्यानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार का?” असे प्रश्न उपस्थित केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे.

एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला या प्रकरणाबद्दल पुरेशी माहिती का पुरवली जात नाहीय असा प्रश्नही रुपा यांनी ट्विटवरुन उपस्थित केला आहे. “इतर कोणाच्या हातांचे ठसे कपड्यांवर किंवा घटनास्थळी आढळून आले?, यासारखी माहिती मिळाली तर आपल्याला या प्रकरणाबद्दलं वेगळचं काहीतरी कळू शकतं,” असं रुपा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी फॉरेन्सिक टीम दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ जूनला का सुशांतच्या घरी गेली असा सवाल उपस्थित केला आहे. “फॉरेन्सिक टीम १५ जून रोजी का घटनास्थळी गेली? या काळामध्ये पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी बराच वेळ मिळाला असणार,” असंही रुपा यांनी म्हटलं आहे.

“एक नम्र, सकारात्मक आणि जागृक व्यक्ती म्हणून आपल्याला सर्व खरी माहिती आणि सत्य कळायला हवं. आपल्याला आणखीन उत्तरे मिळायला हवीत,” अशी अपेक्षाही रुपा यांनी व्यक्त केली आहे.

रुपा यांनी सुशांतच्या इस्टाग्राम अकाऊंटबद्दल शंका उपस्थित केलेली असतानाच दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या पोलीस चौकशीदरम्यान दर दिवशी कोणती ना कोणती नवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांनी २० जूनपर्यंत एकूण २३ जणांची चौकशी केली आहे. आता पोलिसांनी आपला तपास सुशांतच्या सोशल मिडिया अकाउंटकडे वळवला आहे. सुशांतच्या ट्विटवर अकाउंटवरुन काही ट्विट डिलीट करण्यात आल्याची शंका पोलिसांना आहे असं वृत्त पिंकव्हिलाने दिलं आहे. यासंदर्भात पोलीस आता चौकशी करत असून मुंबई पोलिसांनी ट्विटरला एक पत्र पाठवल्याचं वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी ट्विटरकडून सुशांतच्या अकाउंटसंदर्भातील मागील सहा महिन्याची माहिती मागवली असल्याचे सांगण्यात येत आहे. सुशांतच्या ट्विटर अकाउंटवरुन शेवटचं ट्विट डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आल्याचं दिसत आहे.