अजय देवगणच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये ‘मीटू’चे (#MeToo) आरोप असलेले ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथसुद्धा झळकले होते. बलात्कारसारख्या गंभीर आरोपांनंतरही आलोक नाथ यांना चित्रपटात काम कसं देऊ शकता, असा प्रश्न तनुश्री दत्ताने उपस्थित केला आहे. यावेळी तिने अजय देवगण आणि चित्रपटाच्या निर्मात्यांवर हल्लाबोल केला आहे.

‘खोट्या, दिखावा करणाऱ्या आणि ढोंगी लोकांनी सिनेसृष्टी भरलेली आहे. आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप आहेत. जर आरोपांपूर्वी चित्रीकरण झालं असेल तर त्यांच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला घेऊन पुन्हा चित्रीकरण करता आलं असतं. पण निर्मात्यांनी असं नाही केलं. एका बलात्कारी पुरुषाला निर्मात्यांनी चित्रपटात स्थान दिलं. ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत आलोक नाथ त्यात आहेत हे कोणालाच माहीत नव्हतं. अजय देवगण आणि निर्मात्यांना त्यांची भूमिका बदलण्याची संधी होती,’ अशी टीका तनुश्रीने केली.

चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमात लेखक आणि निर्मात्यांना आलोक नाथ यांच्यावरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अजय देवगणने सारवासारव करत म्हणाला, ‘याविषयी बोलण्यासाठी ही योग्य वेळ नाही आणि चित्रपटाची शूटिंग आलोक नाथ यांच्यावर आरोप लागण्यापूर्वी झाली होती.’

गेल्या वर्षी आलोक नाथ यांच्यावर निर्माती विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर बी-टाऊनमधील काही कलाकार पुढे येत आलोक नाथ यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले.