देशभरामध्ये काल ७० वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे राहिले नाहीत. काही कलाकारांनी शाळेत जाऊन किंवा चित्रपटाच्या सेटवर हा दिवस साजरा केला तर काही कलाकारांनी थेट वाघा बॉर्डरवर जाऊन या दिवसाचं महत्व जाणून घेतलं. यामी गौतम, विकी कौशल आणि वरुण धवन या कलाकारांनी वाघा बॉर्डरवर जाऊन जवानांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी वरुणने केवळ जवानांची भेटच घेतली नाही तर त्यांच्यासोबत एक गाण्यावर थिरकलाही. वरुणचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.

प्रजासत्ताक दिनाचं महत्व जाणून विकी,यामी आणि वरुणने भारतीय जवानांची भेट घेतली. या भेटीमध्ये या तिघांनीही जवानांसोबत संवाद साधला. यावेळी वरुणने देशभक्तीवर आधारित गाण्यावर डान्स करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी बीएसएफचे जवानही त्याच्यासोबत थिरकताना पाहायला मिळालं. वरुणने या डान्स वेळी काळ्या रंगाचे जॅकेट घातलं होतं. या डान्सचा व्हिडिओ वरुण आणि विकी या दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, नुकताच विकी आणि यामीचा ‘उरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये विकीने केलेल्या अभिनयामुळे त्याची सध्या सर्व स्तरांमध्ये चर्चा होत आहे. तर वरुण लवकरच त्याच्या आगामी ‘कलंक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून या चित्रपटामध्ये आलिया भट, संजय दत्त, माधुरी दीक्षित ही दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत.