ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी त्यांच्या आजवरच्या अभिनय कारकीर्दीतील आठवणींवर लिहिलेल्या ‘मी एक छोटा माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या पुढील महिन्यात मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे होणार आहे. चतुरंग प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पुस्तक प्रकाशनाचा सोहळा होणार आहे. सावरकर यांनी अलीकडेच वयाची ८१ वर्षे पूर्ण केली. या वयातही ते चित्रपट आणि नाटकातून काम करत आहेत. रंगभूमीवरील त्यांच्या अभिनय प्रवासालाही ६१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या या पुस्तकानिमित्ताने..
नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे ठरविले तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य मामा पेंडसे यांनी त्यांना ‘हे बघ व्यवहार म्हणून या गोष्टीला माझा विरोध राहील. कारण माझी मुलगी मी तुला दिली आहे. पण एक अभिनेता म्हणून विचारशील तर माझा पूर्ण पाठिंबा असेल. रंगभूमीवर श्रद्धेने आणि निष्ठेने काम कर. तिथे पैसा मिळाला नाही म्हणून पुन्हा नोकरी स्वीकारलीस तर या घराची पायरी पुन्हा चढायची नाही’ अशा शब्दात सल्ला दिला. सावरकर यांनी त्यांची पत्नी उषा हिला सासरे काय म्हणाले ते सांगितले. त्यावर तिनेही ‘मी एका अभिनेत्याची मुलगी असून गरिबी काय असते ते मी अनुभविले आहे. त्यामुळे नोकरी सोडून तुम्हाला रंगभूमीवर पूर्ण वेळ काम करायचे असेल तर जरूर करा. माझा तुम्हाला पाठिंबाच राहील’असा विश्वास पत्नीने त्यांना दिला..
वयाची ८१ वर्षे आणि रंगभूमीवरील कारकीर्दीची ६१ वर्षे पूर्ण केलेल्या जयंत सावरकर यांनी सासरेबुवांचा सल्ला मानला. श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा त्यांनी सुरू केली व आजही ते करत आहेत. या वयातही त्यांचे नाटकाचे दौरे, प्रयोग सुरू आहेत. विक्रम गोखले व रिमा यांच्या ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकात ते होते. अलीकडेच रंगभूमीवर दाखल झालेल्या ‘ओ वुमनिया’ या नाटकातही ते काम करत आहेत. १९५५ मध्ये रंगभूमीपासून सुरू झालेल्या प्रवासातील असंख्य आठवणी व किस्से त्यांच्याकडे आहेत. केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम, परशुराम सामंत, दादा साळवी, जयराम शिलेदार, पंडितराव नगरकर, सुरेश हळदणकर, भालचंद्र पेंढारकर, मा. अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर, बाळ कोल्हटकर, रामदास कामत, राजा परांजपे, रमेश देव ते आजच्या पिढीतील मंगेश कदम, अद्वैत दादरकर यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे.
‘मी एक छोटा माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्र नाही, तर त्यांनी ज्या दिग्गज मंडळींबरोबर काम केले, ज्यांच्या सहवासात राहण्याची संधी त्यांना मिळाली आणि ज्यांच्याकडून त्यांना शिकायला मिळाले त्या सर्वाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील ‘सवरेत्कृष्ट अभिनेता’ म्हणून २० वर्षांपूर्वी त्यांचा गौरव करण्यात आला तेव्हाच अशा आठवणी लिहाव्या असे त्यांच्या डोक्यात आले. मात्र आत्मचरित्र स्वरूपात त्यांना त्या लिहायच्या नव्हत्या. एकमेकांशी गप्पा मारताना जशा आठवणी सांगतो त्या स्वरूपात त्यांना ते मांडायचे होते. त्यांनी डायरी स्वरूपात या आठवणी लिहायला सुरुवातही केली. याचे पुस्तक निघाले नाही तर आपल्या घरातील मंडळींना आणि नातेवाईकांना आपण काय केले त्याची माहिती मिळेल, असा विचार या मागे होता. आता या आठवणींना पुस्तकांचे कोंदण लाभले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सावरकर यांना बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी ‘आपण आठवणी लिहितोय, पण त्या प्रसिद्ध होतील की नाही ते माहिती नाही’ असे सांगितले. त्या कार्यक्रमास ‘उद्वेली प्रकाशन’चे विवेक मेहेत्रे उपस्थित होते. त्यांनी सावरकर यांना या आठवणींचे पुस्तक काढतो असे सांगितले. तो योग आता २७ ऑगस्ट रोजी जुळून येत आहे. प्रायोगिक रंगभूमीशी निगडित असलेल्या चैत्राली ओक यांनी या आठवणी लेखनात सावरकर यांना सहकार्य केले आहे.
‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात होणाऱ्या एका कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले सावरकर यांच्यावर बोलणार आहेत. सुधीर गाडगीळ सावरकर यांची प्रकट मुलाखत घेणार असून सावरकर यांचा मुलगा कौस्तुभ, कन्या सुषमा व सुपर्णा आणि पत्नी उषा हेही या गप्पांमध्ये सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची सांगता सावरकर यांनी सादर केलेल्या ‘तळीराम’ आणि ‘अंतुबर्वा’ या दोन भूमिकांच्या स्वगतानी होणार आहे.
सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाटय़संस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाटय़ शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले. पुढे ‘वाजे पाऊल आपुले’, ‘नयन तुझे जादुगार’ या नाटकातून त्यांनी काम केले. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘सूर्यास्त’, ‘अपूर्णाक’ पासून ते अगदी अलीकडच्या ‘लहानपण देगा देवा’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ ते ‘ओ वुमनिया’पर्यंत त्यांनी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. पद्य नाटकांबरोबरच संगीत नाटकातूनही त्यांनी काम केले आहे. नाटक, चित्रपट, मालिका यांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. या वयातही ते नाटकांचे प्रयोग, दौरे करत असतात. लवकरच त्यांनी काम केलेले ‘बिस्कीट’, ‘झांगडगुत्ता’ आणि आणखी दोन/चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
गेली अनेक वर्षे पहाटे चार वाजता उठणे, दररोज चार ते पाच किलोमीटर चालणे, पोहणे सुरू आहे. आजही यात खंड पडलेला नाही. ते बाहेरचे खाणे शक्यतो टाळतात. नाटकाचा प्रयोग किंवा चित्रीकरण असेल तर घरून निघताना आपला स्वत:चा पोळी-भाजीचा डबा बरोबर घेतात. कोणतीही वस्तू कर्ज काढून घ्यायची नाही असे त्यांचे तत्त्व होते. त्यामुळे स्वत:कडे गाडी घेण्याइतपत पैसे जमा झाल्यानंतरच त्यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी सेकंडहॅण्ड गाडी विकत घेतली. अभिनयाची समजूत येणे आणि उत्तम अभिनय करणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उत्तम अभिनय सरावाने जमू शकतो. पण अभिनयाची समजूत ही त्या भूमिकेचे अंतरंग, भूमिकेची सुरुवात व शेवट हे समजून घेतले तरच त्या कलाकाराला येऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. बदलणाऱ्या गोष्टी आणि तंत्राशी ते सहजपणे जुळवून घेतात. त्यामुळेच आजच्या नव्या पिढीतील कलाकार आणि दिग्दर्शकांबरोबर ते काम करू शकतात. नवीन गोष्टी घेऊनच पुढे गेले पाहिजे. वाहते पाणी हे नेहमीच स्वच्छ असते. ते थांबले की त्यात शेवाळे साचून ते गढूळ होते, असे त्यांचे सांगणे आहे. त्यामुळेच या वयातही नवनवी आव्हाने स्वीकारायला त्यांना आवडते आणि ते ती स्वीकारतातही..

aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!