मागील आठवड्यामध्ये अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मिशन मंगल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने २०१३ साली प्रक्षेपण केलेल्या मंगळयान मोहिमेवर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर सिनेमातील पाच अभिनेत्रीपेक्षा अक्षय कुमारचा फोटो मोठो आकाराचा का लावण्यात आला आहे असा प्रश्न ट्रेलर लॉचिंगच्या कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी विचारला. अक्षयने याला उत्तर दिले मात्र चर्चा झाली ती विद्या बालनने दिलेल्या उत्तराची.

‘इस्रोमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या कतृत्वाला सलाम करणार हा सिनेमा असला तरी त्यावर तुमचा फोटो एवढा मोठा आणि अभिनेत्रींचा फोटो लहान आकारात का लावण्यात आला आहे?’, असा सवाल एका पत्रकाराने अक्षय कुमारला विचारला. ‘आम्ही या सिनेमाचे पोस्ट पाहून खूप खूश आहोत. हा सिनेमा या महिलांचा आहे हे मी आधीही सांगितलं आहे,’ असं उत्तर अक्षयने दिले. त्यावेळी अक्षयच्या बाजूला बसलेल्या विद्या बालनने त्याच्या हातातील माईक घेतला आणि ‘या सिनेमाच्या पोस्टरवर अर्ध्याहून अधिक भागावर अक्षय दिसतोय कारण (इंग्रजी म्हणीप्रमाणे) Men Are From Mars’, असं मजेशीर उत्तर दिले. याच कार्यक्रमामध्ये बोलताना विद्याने ‘आम्हा सर्व कलाकारांनी एकमेकांबरोबर काम करताना खूप मजा आली. तसेच माझ्या आयुष्यातील हा पहिला सिनेमा आहे ज्यासाठी मी अधिक विचार न करता होकार दिला,’ अशी माहिती दिली.

दरम्यान या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्याव्यतिरिक्त या टीम तारा शिंदे (विद्या बालन), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), शर्मन जोशी (परमेश्वर नायडू), नेहा सिद्दिकी (कृति कुल्हारी) नजर हे कलाकार झळकणार आहेत. मंगळ मोहिमेची योजना आखण्यापासून ती यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखविण्यात आला आहे.

हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.