विराट कोहली व अनुष्का शर्माच्या लग्नाला आता बराच काळ लोटलाय परंतु हे जोडपं अजूनही चाहत्यांच्या चर्चेत आहे. विवाहापूर्वीही विराट व अनुष्काची चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये तावातावानं बघायला मिळायची. अनुष्कानं सामना बघायला जाणं असो, विराटनं फ्लाइंग किस देणं असो की अनुष्काचा ड्रेसिंग रूममधला वावर असो त्यांच्या चाहत्यांनी नेहमीच या दोघांना प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आताही विराट न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती घेतली असून तो व अनुष्का विदेशात सुट्टीचा आनंद घेत आहेत. तर चाहते मात्र ट्विटर व इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांची ख्यालीखुशाली जाणून घेताना दिसत आहेत.
त्यांच्या या नात्याबद्दल अनेकांना कुतुहल असून ते एकमेकांबद्दल काय सांगतात याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अनुष्कानं सांगितलं होतं की तिच्या मते प्रामाणिकपणाला प्रचंड महत्त्व आहे. मी स्वत: अत्यंत प्रामाणिक आहे आणि त्याची मी शिक्षाही पुरेपुर भोगलीय असंही ती सांगते. विशेष म्हणजे विराटमध्येही हा गुण असून त्याचं तिनं वारेमाप कौतुक केलं आहे. माझ्यामध्ये व विराटमध्ये हा एक समान गुण असून असा जोडीदार मिळाला त्यामुळे मी प्रचंड खुश असल्याचं तिनं सांगितलं आहे.
“Me & my wife like to do normal things, we just like going around for walks. Last night we were at the marine parade, full moon, we were just enjoying that sitting on a bench just talking. It’s actually the most simplist things that give us a lot of joy…” @imVkohli
आमच्यातलं नातं इतकं पारदर्शी नी स्वच्छ आहे की कुठल्याही गोष्टीचं ढोंग आणावं लागत नाही असं ती सांगते. सध्या विराटबरोबर सुट्टीचा आनंद घेत असलेली अनुष्का सांगते की, विराट सतत स्वत:मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो; व्यावसायिक पातळीवर तसंच एक व्यक्ती म्हणून! आमच्यामध्ये खूप साम्य आहे, त्यामुळे आमचं चांगलं जमतं असंही तिनं म्हटलं आहे.
याआधी विराटनंही मला व अनुष्काला साध्या साध्या गोष्टी करायला आवडतात असं सांगितलं होतं. चांदण्यामध्ये चालणं असो की बागेमध्ये बाकड्यावर बसून गप्पा मारणं असो; साध्या साध्या गोष्टींमध्ये दोघांनाही आनंद मिळतो असं विराटनं म्हटलंय. आम्ही दोघंही सतत लोकांच्या नजरेत असतो त्यामुळे लोकांच्या नजरेपासून दूर राहत साधं जगणं हेच आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं विराटनं सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2019 1:28 pm
Web Title: virat kohli anushka sharma have some common characteristics