अग ‘निन्ये’ मी आलेय बरं का.. अशी साद दरवाजातून सभागृहात प्रवेश करताना साक्षात विजया मेहता यांनी घातली आणि सभागृहाचा सारा नूर पालटून गेला. विजयाबाईंच्या विद्यार्थिनी असलेल्या आजच्या आघाडीच्या अभिनेत्री नीना कुलकर्णी, रिमा लागू, मीना नाईक यांनी आपल्या बाईंभोवती गराडा घातला आणि एकमेकींशी थट्टा मस्करी करत बाईंसह सर्वजणी जुन्या आठवणींत रमून गेल्या..
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटर येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेस ‘पंचम निषाद’चे संचालक शशी व्यास, निवेदक, निर्माते-दिग्दर्शक अजित भुरे उपस्थित होते. या संस्थेतर्फे अभिनेते आणि दिग्दर्शक यांच्यासाठी नाटय़ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून ही कार्यशाळा स्वत: विजयाबाई घेणार आहेत. त्यानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
‘अगं येथे येण्यासाठी मी वेळेअगोदरच निघाले, पण वाटेत वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे इकडे यायला वेळ लागला, असे सांगत विजयाबाईनी आपल्या जुन्या विद्यार्थिनींची आस्थेने विचारपूस केली. विजयाबाई येण्यापूर्वी या तिघी तसेच भुरे यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना ‘बाईट’ दिले होते. विजयाबाईंना ते कळल्यानंतर, ‘काय गं. चांगलच बोललात ना माझ्याबद्दल?’ असे त्यांनी या मंडळींना विचारले. त्यावर भुरे यांनी, ‘या तिघी तुमच्याबद्दल चांगले बोलल्या मी मात्र थोडे वाईट बोललो, असे मिश्किलपणे सांगितल्यानंतर सगळेच त्यावर हास्यकल्लोळात बुडाले.
थोडय़ा गप्पाटप्पा झाल्यानंतर व्यास आणि भुरे यांनी बाईंना पत्रकार परिषद सुरू करण्यासाठी व्यासपीठावर येण्याची विनंती केली. पत्रकार परिषदेची अनौपचारिक सुरुवात करताना भुरे म्हणाले, मला बाईंबरोबर नाटकात प्रत्यक्ष काम करण्याची किंवा त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली नाही. पण मी सध्या बाईंबरोबर मुलाखतीचा एक कार्यक्रम करतोय. यामुळे मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतंय. रिमा, नीना कुलकर्णी आणि मीना नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना ‘विजयाबाईंमुळेच आम्ही घडलो’ असे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. रिमा म्हणाल्या, ‘पुरुष’ नाटकाच्या निमित्ताने विजयाबाई आणि माझी पहिली भेट झाली. नाटकाची तालीम बाईंच्या दृष्टीने खूप महत्त्वाची. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. नेमके काय करायचे नाही हे त्यांनी शिकविले. ‘पुरुष’मधील ‘अंबिका’ ही भूमिका माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. मीना नाईक यांनी सांगितले की, विजयाबाई हे एक ‘स्कूल’ आहे. ‘देवाजीने करुणा केली’ या नाटकात मी काम केले होते. शिस्त, संहिता आणि एखाद्या भूमिकेवर काम कसे करायचे, हे त्यांच्याकडूनच शिकायला मिळाले. तर नीना कुलकर्णी यांनी ‘आपल्यात जे आहे ते शोधून काढण्याची उर्जा बाईंमुळे मला मिळाली. माझ्यातल्या अभिनेत्रीचा शोध घेणे अद्यापही सुरूच आहे.कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या ‘गिनीपीग’वर मी काय प्रयोग करणार आहे, ते पाहण्यासाठी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी जरूर या, असे मिश्किलपणे सांगत या अनौपचारिक गप्पांचा विजयाबाईंनी समारोप केला.