अलिकडेच अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेली ‘पाताल लोक’ ही बेव सीरिज प्रचंड गाजत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित या सीरिजचं कथानक एका प्रसिद्ध पत्रकाराच्या हत्येच्या कटाभोवती फिरताना दिसतं. गुढ, रहस्याने भरलेल्या या वेब सीरिजची अत्यंत रंजक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या भागापासून ही सीरिज प्रेक्षकांच्या नजरा खिळून ठेवत आहे. या सीरिजच्या कथानकाबरोबरच त्यातील पात्रांचीही विशेष चर्चा रंगत आहे. ‘चाकू’ची भूमिका साकारणारा जगजीत संधू याची चर्चा थांबत नाही, तर आता यातील ‘सावित्री’ या कुत्र्याविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या श्वानाचं नाव सावित्री का याविषयी नेटकरी विविध तर्क-वितर्क लावत आहेत.

‘पाताल लोक’ या सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत असून सोशल मीडियावर सीरिजमधील पात्रांची चर्चा रंगली आहे. तसेच काही मीम्सही व्हायरल होत आहेत. यामध्येच सारिजमधील कुत्र्याचं नाव सावित्री का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र काही नेटकऱ्यांनी तर्क लावत या कुत्र्याचं नाव सावित्री का असावं असं सांगितलं आहे.

या सीरिजमध्ये पत्रकार संजीव मेहरा यांच्या हत्येचा कट रचला जातो. मात्र त्यांच्या पत्नीमुळे त्यांच्यावर आलेलं संकटं दूर होतं. संजीव मेहरा यांची पत्नी श्वानप्रेमी असल्यामुळे तिने घरात सावित्रीला (कुत्रा) आणलं असतं. विशेष म्हणजे संजीवला मारणारा मारेकरीही श्वानप्रेमी असल्यामुळे तो त्याचा निर्णय बदलतो असं दाखविण्यात आलं आहे.  यावरुनच नेटकऱ्यांनी सावित्रीच्या नावाचा संबंध थेट सत्यवान-सावित्री या पौराणिक कथेशी जोडला आहे.

पौराणिक कथांमध्ये सावित्रीने यमराजाकडे पतीचे प्राण परत मागून त्याला जीवनदान दिलं होतं. तसंच या सीरिजमध्ये संजीव मेहरा याचे प्राणही घरातील सावित्रीमुळे वाचले आहेत. संजीवला मारण्यासाठी निघालेला हातोडी हा श्वानप्रेमी असल्यामुळे तो त्याचा निर्णय बदलतो. विशेष म्हणजे संजीव यांच्या घरात कुत्रा असल्यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच या कुत्र्याचं नावदेखील सावित्री ठेवल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

‘पाताल लोक’ ही वेब सीरिज १५ मे पासून अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे. या थ्रीलर क्राईम सीरिजमध्ये जयदीप अल्हावत, गुल पनाग, स्वास्तिका मुखर्जी हे कलाकार अभिनय करताना दिसत आहेत. ‘NH10’ आणि ‘उड़ता पंजाब’चे लेखक सुदीप शर्मा यांनी या सीरिजची कथा लिहिली आहे.