पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढलेल्या दाढीच्या लूकवरुन सर्वच स्तरावरुन गेल्या वर्षभरापासून प्रतिक्रिया येत आहेत. टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान असा उल्लेख शिवसेनेच्या मुखपत्रातून देखील करण्यात आला होता. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाढी वाढवली असल्याची टीका मोंदीवर करण्यात येत होती. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन निशाणा जीडीपीची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीशी केली होती. करोनाकाळात ऑक्सिजन आणि बेड्सचा देशभरात तुटवडा निर्माण झाला आहे. यावरुन आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी देखील पंतप्रधान मोदींवर दाढीवरून टीका केली आहे.

“ते (मोदी) अक्षरशः हिमालयात डोंगरांभोवती फिरणारे बाबा वाटतायत ज्यांना देशातील ऑक्सिजन, बेड्सच्या समस्येबद्दल काहीच कल्पना नाहीय, अशा दिसणाऱ्या पंतप्रधानांची मला प्रामाणिकपणे लाज वाटत आहे. तर सर कमीत कमी दाढी तरी करा,” अशा शब्दात राम गोपाल वर्मांनी टीका केली आहे.

देशात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक ठिकाणी निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना रुग्णांसाठी सर्वच प्रकारच्या बेड्सची कमतरता दिसून येत आहे. यावरुन; राम गोपाल वर्मांनी ट्विट करत पंतप्रधानांनवर टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान, जगभरातून भारताच्या मदतीसाठी हात पुढे सरसावले आहेत. देशात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी विशेष ऑक्सिजन एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला जात आहे.