चित्रपटाचे यश नेमके कशात मोजायचे?
गुणवत्तेत मोजायचे तर गुरुदत्तचा ‘कागज के फूल’ सर्वकालीन सर्वश्रेष्ठ कलाकृती ठरते. पन्नास वर्षांनंतरही त्याचे अस्वस्थपण कुठेही कमी झाल्यासारखे वाटत नाही, पण त्या काळात त्याला व्यावसायिक यश लाभले नाही.
अगदी ताजे उदाहरण सांगायचे तर विशाल भारद्वाजचा ‘हैदर’ उत्तम कलाकृती आहे, पण त्याच्या स्पर्धेतील ‘बँग बँग’ला गर्दी जास्त आहे. असा ‘खेळ’ बऱ्याचदा रंगतो.
आता तर एखादा बडा चित्रपट पाहणारा ‘जनसामान्य रसिक’ भेटण्यापूर्वीच त्या चित्रपटाने चार दिवसांत सत्तर-बाहत्तर कोटीची कमाई केल्याच्या प्रचारकी बातम्या पद्धतशीरपणे प्रसिद्ध होत राहतात. साजीद खानच्या ‘हमशक्कल्स’नेही असा ‘कोटीच्या कमाई’चा विक्रम करावा हा मोठा विनोद ठरावा.
पण कोणत्या चित्रपटाने किती दिवसांत किती कोटीची कमाई केली यावरून चित्रपटाचे ‘मूल्य’मापन व्हावे याचाच अर्थ, कोणत्याही कलाकृतीची समीक्षा अथवा विश्लेषण करण्याची ‘दृष्टी’ कुठे तरी बाजूला पडत चालली आहे असे म्हणायचे का?
राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) त्या काळात ‘पडला’ असेल (की पद्धतशीरपणे पाडला? हीदेखील त्यात वेगळी शस्त्रक्रिया) तरी त्याच्या खऱ्या-वाईट गुणवत्तेची भरपूर चर्चा झाली. ‘मद्रास कॅफे’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कोम’, ‘मर्दानी’ अशा मनोरंजनाची चौकट सांभाळूनही वेगळी वाट धरणाऱ्या चित्रपटांची चर्चा व्हायला हवी होती. ‘कमाईच्या कोटीच्या कोटी’ उड्डाणात हा रंग थोडासा फिका ठरला.
बरं, ‘आठवडय़ामागून आठवडे’ अशा स्वरूपात एखाद्या चित्रपटगृहात एखाद्या चित्रपटाने मुक्काम केला, म्हणजे तो गुणवान म्हणायचा का?
रमेश सिप्पीच्या ‘शान’ला त्याच्याच ‘शोले’च्या दर्जाची सर आली नाही, तरी ‘शान’नेही ‘शोले’वाल्या मिनव्‍‌र्हातच रौप्यमहोत्सवी यश संपादले. मनोजकुमारचा ‘पूरब और पश्चिम’ गाण्याचे सादरीकरण वगळता फारसा न जमलेला चित्रपट होता. तो पडला, पडला असे म्हटले जाऊनही त्याने ऑपेरा हाऊसमध्ये रौप्यमहोत्सवी यश संपादले.
राजेंद्रकुमार तर ‘ज्युबिलीकुमार’ म्हणूनच ओळखला गेला. हमराही, घराना, ससुराल, सूरज वगैरे वगैरे चित्रपट प्रदर्शित होत ते रौप्यमहोत्सवी आठवडय़ापर्यंत मुक्काम करत.
राजेश खन्नाच्या तर खामोशी, इत्तेफाक, आराधना, दो रास्ते, द ट्रेन, हाथी मेरे साथी, आनंद, मर्यादा, बंधन, अमरप्रेम, अपना देश, कटी पतंग, आन मिलो सजना.. ओळीने अठरा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. हा विक्रम कधीच मोडला जाणारा नाही. पण या चित्रपटाचे खरे ‘मूल्य’मापन एवढय़ानेच करता येणार नाही. त्यापेक्षा त्यातला आशय, अभिनय व संगीत यांचे गुण खूप खूप मोलाचे आहेत. तेच तर महत्त्वाचे असतात.
रमेश सिप्पीचा ‘शोले’चा सर्वाधिक आठवडय़ाचा विक्रम होता. १५ ऑगस्ट १९७५ रोजी झळकताना मिनव्‍‌र्हा त्याचे मुख्य चित्रपटगृह होते. तेथे ३१ ऑगस्ट ७८ पर्यंत तो ‘दिवसा तीन खेळ’ याप्रमाणे प्रत्येक खेळ हाऊसफुल्ल या पद्धतीने चालला, तर मग तो सकाळच्या खेळाला म्हणजेच ‘मॅटिनी शंो’ला वळवण्यात आला व त्याने आणखी दोन वर्षे मुक्काम केला. ‘शोले’ने समाजावर एवढा प्रभाव कसा बरे टाकला हा अभ्यासाचा विषय ठरू शकतो. एखादा चित्रपट लोकप्रिय ठरतो, प्रेक्षक तो पुन्हा पुन्हा पाहू इच्छितात याचा विचार करताना तो किती आठवडे चालला, त्याने किती कोटीची कमाई केली यापलीकडे जाऊन त्याची दखल घ्यायला हवी. आज मिनव्‍‌र्हाची इमारत जमीनदोस्त झाली आहे, पण आजही तेथून जाताना ‘कितने आदमी थे’ यासारखे संवाद कानावर पडताहेत की काय, असा भास होतो. ‘शोले’ या देशाची लोककथा ठरला, इतका तो समाजात मुरला. जगभरच्या सिनेमाच्या तुलनेत आपल्या सिनेमाचे वेगळेपण म्हणजे, आवडलेला सिनेमा आपल्या प्रेक्षकांचा भावनिक आधार ठरतो.
आता यशराज फिल्मचा आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ एक हजाराव्या आठवडय़ाकडे वाटचाल करीत आहे. १२ डिसेंबर रोजी तो टप्पा पूर्ण होईल.  १९९५ च्या २० ऑक्टोबर रोजी तो थाटात झळकला. तेव्हा मुंबईत त्याचे मुख्य चित्रपटगृह न्यू एक्सलसियर होते. तेथे पन्नास आठवडय़ाचा मुक्काम केल्यावर तो मराठा मंदिर येथे ‘सकाळच्या खेळा’ला वळवण्यात आला, पण तेव्हा तो इतकी मजल मारेल असे कोणाला वाटले होते की नाही, हा प्रश्नच नाही. पण रसिकांची अख्खी एक पिढी ओलांडूनही या प्रेमकथेचा चित्रपटगृहातला मुक्काम कायम आहे हे महत्त्वाचे! शाहरुखला या चित्रपटाने ‘बाजीगर’ व ‘डर’ यांच्या नकारात्मक प्रतिमेच्या बाहेर आणले, पण बराच काळ तरी हाच शाहरुख दिलवाले दुल्हनियामधीलच व्यक्तिरेखा व शैली यांची नक्कल करतोय असे वाटले. ‘चक दे इंडिया’, ‘डॉन’ येईपर्यंत त्याचा हाच ‘खेळ’ रंगला. काजोलची उत्स्फूर्त तितकीच सहज अदाकारी हेही या चित्रपटाचे वैशिष्टय़!
‘एका प्रेमपटाचा हजाराव्या आठवडय़ापर्यंतचा प्रवास एवढेच याचे मूल्यमापन होऊ नये. दरम्यान, समाज बदलला, जागतिकीकरणाचे वारे रुजले, संपर्क व माध्यम या दोन्हीत प्रचंड क्रांती झाली (१९९५ साली पेजरही नव्हता, मोबाइल तर दूरच), एक पडदा चित्रपटगृह संस्कृती मागे पडून मनोरंजन संकुल (अर्थात मल्टीप्लेक्स) आले, सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक-राजकीय-लैंगिक क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झाली, त्या सगळ्या बदलांचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ साक्षीदार आहे. एखाद्या चित्रपटाची गुणवत्ता अशी देखील तपासायला हवी..