शोले चित्रपटाचं नाव घेतलं की प्रामुख्याने डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या जय-विरु आणि गब्बर या तीन भूमिका. अभिनेता धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि अमजद खान या कलाकारांनी या तिन्ही भूमिका उत्तम न्याय दिला. त्यामुळे आजही या भूमिका आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला आहे. विशेष म्हणजे जय-वीरुसोबतच गब्बरशिवाय या चित्रपटाची कोणी कल्पनाही करु शकत नाही. खलनायकाची भूमिका साकारुनही अमजद खान लोकप्रिय झाले होते. ‘शोले’ चित्रपटानंतर खान यांनी अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले. त्याकाळी ते खूप लोकप्रियही होते. याच लोकप्रियतेशी निगडीत एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
‘शोले’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांच्या अवधीने अमजद खान त्यांच्या पत्नी व मुलांसोबत जुहू बीचवर फिरायला गेले होते. त्याच वेळी अमजद खान यांना पाहिल्यावर काही जण त्यांच्या दिशेने धावत येत असल्याचं त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलं. त्यांनी ही गोष्ट अमजद यांना सांगितली. त्यांचे चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाल्यामुळे लोक अमजद यांना ओळखू लागले होते. त्यामुळेच अमजद जुहू बीचवर दिसल्यानंतर लोकांनी त्यांना भेटण्यासाठी धाव घेतली. मात्र, लोकांची इतकी गर्दी पाहून अमजद खान काहीसे गोंधळून गेले आणि तिथून पळ काढला.
‘शोले’मध्ये अमजद खान यांना गब्बर करायला द्यावा असे अनेकांना वाटत नव्हते. पण सिनेमाचे लेखक यांनी या भूमिकेसाठी अमजदच कसे योग्य आहेत ते पटवून दिले. ‘शोले’मध्ये संजीव कुमार यांनी ठाकूरची भूमिका साकारली हे तर खरं. पण, ती भूमिका आधी धर्मेंद्र साकारणार होते आणि वीरुची भूमिका संजीव कुमार साकारणार होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वीच संजीव कुमार यांनी हेमा मालिनीला प्रपोज केलं होतं. हे सर्व ज्यावेळी धर्मेंद्र यांना कळलं तेव्हा त्यांनी लगेचच वीरुची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला, असंही म्हटलं जातं.