दूरदर्शनवरील ‘रामायण’ या मालिकेने विश्वविक्रम प्रस्थापित केला. लॉकडाउनमध्ये ही मालिका सर्वाधिक पाहिली गेली. सध्या प्रसारित होणाऱ्या उत्तर रामायणालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी उत्तर रामायणाविषयी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. रामानंद सागर उत्तर रामायणाचं दिग्दर्शन का करू शकले नव्हते, याचंही कारण त्यांनी सांगितलं.

“उत्तर रामायणाच्या सुरुवातीच्या शूटिंगला रामानंद सागर उपस्थित राहू शकले नव्हते. ते मालिका दिग्दर्शित करू शकले नव्हते. यामागचं कारण म्हणजे त्यांना रामायणावरील खटल्यांमुळे अनेकदा कोर्टात जावं लागायचं. त्यामुळे ते फक्त स्क्रिप्ट आम्हाला पाठवायचे. रामायणात दाखवलेल्या काही दृश्यांवरून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले होते. त्यामुळे उत्तर रामायणाचं दिग्दर्शन त्यांची मुलं मोती आणि आनंद सागर करायचे”, असं त्यांनी सांगितलं.

उत्तर रामायणाच्या शूटिंगसाठी दीपिका उमरगावमध्ये २८ दिवस राहायचे. त्यावेळी त्या बंगाली आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका साकारत होत्या. “भारतीय संस्कृतीतील एकल मातृत्त्वाची ही पहिलीच कथा असावी”, असं त्या म्हणाल्या. उत्तर रामायणात सीतेचा वनवास, वाल्मिकी ऋषी, लव-कुश यांचे संगोपन व शिक्षण याबद्दलची कथा दाखवण्यात आली आहे. १९८८ ते १९८९ या कालावधीत उत्तर रामायण प्रसारित झालं होतं.