News Flash

दिग्गज कलाकारांचा ‘गुलमोहर’

वयाच्या एका विशिष्ट टप्यावर आल्यानंतर जोडीदारासोबत असलेले अनुभवांचे गाठोडे भरलेले असते.

आयुष्यभराची साथ देण्यासाठी निवडलेल्या जोडीदारासोबतचे प्रेम बदलत्या काळानुसार वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर कसे भासते, याचे कथारूपी सादरीकरण ‘झी युवा’च्या ‘गुलमोहर’ मालिकेमधून केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘वचन’ ही नवी कथा २९ आणि ३० जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. उतारवयात एकमेकांची साथ देणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यावर ही कथा बेतली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेत्री सुहास जोशी यांनी कथेत मुख्य भूमिका साकारली असल्याने बऱ्याच कालावधीनंतर टेलिव्हिजनवर उत्तम अभिनयाची पर्वणी  प्रेक्षकांना मिळणार आहे.

वयाच्या एका विशिष्ट टप्यावर आल्यानंतर जोडीदारासोबत असलेले अनुभवांचे गाठोडे भरलेले असते. आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असल्यामुळे त्यांच्यामधील प्रेम आणि विश्वास दृढ झालेला असतो. गुलमोहरच्या पुढच्या भागात सादर होणारी ‘वचन’ ही कथादेखील एका वृद्ध जोडप्याने एकमेकांना दिलेल्या वचनाची आहे. गोदावरी आणि चिंतामणरावांनी स्वत:ला मूल नसल्याची खंत बाळगली नाही. त्याऐवजी अनेक अनाथ मुलांना आपलेसे करून त्यांना मायेचे छत्र दिले. या कथेत दोघांच्याही आयुष्यातील अनुभवांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. शरीराने वृद्ध असले तरी हे दोघे मनाने तरुण असल्याने त्यांच्यामध्ये कणखरपणे भरलेले प्रेम आणि विश्वास याचा प्रत्यय या भागातून अनुभवण्यास मिळणार आहे. एवढी वर्षे एकमेकांची साथ दिल्यानंतर पुढे घडणारे प्रसंग त्यांच्यासाठी अनपेक्षित आहेत.

रटाळ अवस्थेतही चालणाऱ्या मालिकांपेक्षा केवळ दोन दिवसांत सशक्त कथेच्या बळावर उत्तम आशय देणारी मालिका किंवा त्याचा भाग करणे कधीही चांगले असते. यासाठीच ‘वचन’ ही कथा अभिनय करण्यासाठी निवडल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दिली. सुहास आणि मी गेली  ३५ वर्षे मराठी चित्रपट आणि नाटय़सृष्टीत काम करत आहोत. मात्र आम्ही एकमेकांसोबत कधीच अभिनय केला नाही. कारण आमचे कलाकार म्हणून जोडलेले नाते आमच्याकडून काम करून घेत होते, असेही त्यांनी सांगितले. मंदार देवस्थळी आणि मंदार जोग या सृजनशील अशा दिग्दर्शक आणि लेखकासोबत काम केल्याचे समाधान असल्याचेही गोखले म्हणाले. सध्या चार दिवस चालणाऱ्या प्रेमसंबंधाच्या जगात, ‘वचन’ मधून दाखविलेले प्रेम बरेच काही सांगून जात जोडप्यांना आणि खासकरून प्रेमसंबंधात असणाऱ्या जोडप्यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडेल, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 1:33 am

Web Title: zee yuva gulmohar tv serial
Next Stories
1 गडद प्रेमफॅण्टसी!
2 मुकुटातली घुसमट
3 आम्ही कात टाकली!
Just Now!
X