दाक्षिणात्य स्टार राम चरणचे अभिनयाव्यतिरिक्त स्वतःचे प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे. राम चरणच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत बनवल्या जाणाऱ्या ‘द इंडिया हाऊस’ या चित्रपटाच्या सेटवर एक मोठी दुर्घटना घडली आहे.
या चित्रपटात निखिल सिद्धार्थ आणि सई मांजरेकर महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. शूटिंग सेटवर पाण्याची टाकी फुटली, ज्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात सेटवर काम करणारे अनेक लोक जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कॅमेरामन गंभीर जखमी
शमशाबादमध्ये ‘द इंडिया हाऊस’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. शूटिंगदरम्यान सेटवर समुद्राच्या दृश्यांसाठी वापरली जाणारी मोठ्या पाण्याची टाकी फुटल्याने एक गंभीर अपघात झाला, ज्यामुळे सर्वत्र पाणी साचले. एका असिस्टंट कॅमेरामनला गंभीर दुखापत झाली आणि इतर अनेक जण जखमी झाले. या घटनेमुळे बरेच नुकसान झाले आहे.
व्हिडीओ झाला व्हायरल
सोशल मीडियावर या अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये प्रॉप आणि उपकरणे खराब झालेले दिसत आहेत. क्रू मेंबर्स वाचवता येतील अशा गोष्टी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण सेट पाण्याखाली गेला आहे. सेट खराब होण्याबरोबरच महागडे कॅमेरेदेखील खराब झाले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सेटवर पाणी साचलेले दिसत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शमशाबाद पोलिसांना अद्याप या अपघाताबाबत कोणताही औपचारिक अहवाल मिळालेला नाही. अपघात झाला तेव्हा निखिल सेटवर होता की नाही हे देखील अद्याप निश्चित झालेले नाही. जखमींवर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच काही काळासाठी शूटिंग थांबवण्यात आले आहे. खबरदारी घेतल्यानंतरही हा अपघात कसा घडला याचा तपास केला जात आहे.
‘द इंडिया हाऊस’बद्दल बोलायचे झाले, तर अनुपम खेर देखील यात दिसणार आहेत. हा चित्रपट राम वंशी कृष्णा दिग्दर्शित करत आहेत. हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. हा एक पीरियड ड्रामा आहे, जो भारताच्या स्वातंत्र्याभोवती फिरतो. हा चित्रपट राम चरणच्या मॅडन प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत बनवला जात आहे. चित्रपटाच्या सेटवर झालेल्या अपघाताबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत विधान शेअर केलेले नाही.