प्रसिद्ध गायक संगीतकार ए आर रेहमान यांनी आपल्या संगीताने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची दोन्ही मुलं देखील संगीत क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावताना दिसत आहेत. तर आता ए आर रेहमान यांचा मुलगा अमीन याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
अमीन गुरुवारी त्याच्या एका गाण्याचे व्हिडीओ शूट करत होता. त्यादरम्यान सेटवर एक मोठा अपघात झाला. सेटवर क्रेनला लटकलेलं एक झुंबर अचानक खाली कोसळलं. हा अपघात जेव्हा झाला त्यावेळी सर्वच शुटिंगमध्ये व्यस्त होते. या अपघातातून तो थोडक्यात बचावला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली.
आणखी वाचा : ए आर रेहमान एका तासाला कमावतात ‘इतके’ कोटी, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क
त्याने सोशल मीडियावर या अपघाताचे फोटो पोस्ट करत लिहिलं, “आज मी सुरक्षित आणि जिवंत आहे याबद्दल अल्लाह, माझे आई-वडील, कुटुंब, प्रियजन आणि अध्यात्मिक गुरु यांचा आभारी आहे. तीन दिवसांपूर्वी मी एका गाण्याचा शूटिंग करत होतो. मला टीमवर विश्वास होता की त्यांनी अभियांत्रिकी आणि सुरक्षेची काळजी घेतली असेल. मी कॅमेऱ्यासमोर माझ्या कामावर एकाग्र असतानाच, झुंबर आणि क्रेनला टांगलेलं सर्व काही खाली पडलं.”
हेही वाचा : “एखाद्या गाण्याचे रिमिक्स करणारे तुम्ही कोण?”, ए. आर. रेहमान संतापले
तो पुढे म्हणाला, “मी अगदी मध्यभागी उभा होतो. जर हे एक इंचही इकडे किंवा तिकडे किंवा काही सेकंद आधी किंवा नंतर झालं असतं तर सर्व काही माझ्या डोक्यावर पडलं असतं. मी आणि माझी टीम पूर्ण शॉकमध्ये आहे आणि त्यातून बाहेर पडू शकत नाही आहोत.” आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून त्यावर कमेंट्स करत नेटकरी त्याच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत.