सध्याच्या तरुण पिढीवर तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा अतिरेक होतो आहे. त्यामुळे लहान मुलं त्यांच्या आजूबाजूला काय घडतं आहे याकडे लक्ष न देता सतत या उपकरणांमध्ये गुंग असतात. याचा परिणाम या मुलांवर होऊन त्यांचे बालपण कुठेतरी या तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हरवते आहे. या भविष्याचा वेध घेणाऱ्या विषयावर भाष्य करणारे जिगीषा-अष्टविनायक निर्मित आणि क्षितिज पटवर्धन यांच्या लेखन-दिग्दर्शनातून साकारलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘आज्जीबाई जोरात’ हे विनोदी महाबालनाट्य रंगभूमीवर दाखल झाले आहे.

लहानांबरोबर मोठ्यांनाही हसवणाऱ्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून अभिनेत्री निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाची निर्मिती दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी यांनी केली आहे. या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर वेशभूषेची जबाबदारी कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी सांभाळली आहे. तसेच संगीत सौरभ भालेराव आणि नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अभिनय बेर्डे यांनी ‘लोकसत्ता’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाबद्दल निर्मिती सावंत म्हणाल्या, ‘नाटक माध्यम हे पूर्णपणे नटाचं माध्यम आहे. नाटकात एक नट अभिनयात वेगवेगळे प्रयोग करत असतो. या नाटकाच्या वाचनापासूनच आमच्यात खूप उत्साह होता. मी या नाटकात आजीची भूमिका केली आहे. ही आजच्या काळातील आजी असली तरी ती आपल्या नातवाला गोष्टी सांगून या जगाशी ओळख करून देण्याचा प्रयत्न करते. खूप खोडकर, मजेदार आणि तेवढीच हुशार अशी ही आजी आहे आणि या नाटकाच्या निमित्ताने ती फक्त तिच्या नातवाशीच नव्हे तर नाट्यगृहात आलेल्या सगळ्या प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांचे मनोरंजन करणार आहे’.

हेही वाचा >>> मृण्मयी देशपांडेने पहिल्या पगारातून घेतलं होतं बाबांना खास गिफ्ट, आई म्हणालेली, “मी आयुष्यात एवढी मोठी रक्कम…”

नव्या बालनाट्याविषयी बोलताना एक गमतीशीर योगायोग जुळून आल्याची आठवणही निर्मिती सावंत यांनी सांगितली. ‘जाऊबाई जोरात’ या नाटकाची सुरुवात ३० एप्रिल २००० रोजी झाली होती. आता ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाची सुरुवातदेखील बरोबर चोवीस वर्षांनी ३० एप्रिललाच झाली आहे, अशी आठवण त्यांनी सांगितली. उत्तम बालनाट्यांसाठी प्रयत्न केले जात असले तरी अशा नाटकांसाठी उत्तम बालप्रेक्षक तयार होणंही गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. ‘आज्जीबाई जोरात’ हे उत्तम संहिता असलेलं नाटक आहे. क्षितिज पटवर्धन याने उत्तमरीत्या या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकात घडणाऱ्या गमती पाहण्यासाठी प्रत्येक पालकांनी नक्की हे नाटक आपल्या मुलांना दाखवावं, त्यामुळे भविष्यात रंगभूमीवर येणाऱ्या नाटकांसाठी एक उत्तम प्रेक्षक तयार होईल, असंही निर्मिती सावंत यांनी सांगितलं.

‘आज्जीबाई जोरात’ या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनय बेर्डे यानेही व्यावसायिक रंगभूमीवरील हे आपलं पहिलंच नाटक असल्याचं सांगितलं. ‘यापूर्वी मी महाविद्यालयात शिकत असताना एकांकिका स्पर्धांसाठी काम केलं आहे. मात्र व्यावसायिक रंगभूमीवर पहिल्यांदाच काम करत असल्याने त्याचं एक दडपण आहे. तसंच आपले संवाद, समोरच्याचे संवाद त्यामधला वेळ, १२ सेट, वेगवेगळी गाणी, नृत्य हे सगळं सांभाळून काम करायचं असल्याने थोडी धाकधूक असते. तेवढीच मज्जादेखील येते, कारण सोबतीला निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले असे उत्तमोत्तम कलाकार आहेत’ असंही अभिनयने सांगितलं.

बालनाट्यांविषयी अधिक विस्ताराने बोलताना निर्मित सावंत म्हणाल्या, ‘लहान मुलांना नाटक बघायचं असेल तर पालक बालनाट्याची वाट पाहतात. मराठी रंगभूमीवर अनेक विनोदी नाटकं होत असतात, पण त्यातील सगळीच नाटकं लहान मुलांनी पाहावी अशी नसतात. त्यामुळे लहान मुलं आणि पालक दोघांनाही एकत्र पाहता येतील अशा ‘आज्जीबाई जोरात’सारख्या नाटकांच्या निर्मितीची गरज आहे’. या नाटकाची गोष्टच अशी आहे की मोठ्यांना त्यांचं बालपणही आठवेल आणि लहान मुलांना अरे हो आम्हीपण असं करतो हे नक्की जाणवेल. त्यामुळे बाल प्रेक्षकांना खेळवून ठेवणारी नाटकं सतत रंगभूमीवर आली तर त्याचा भविष्यात खूप फायदा होईल, असंही मत निर्मिती सावंत यांनी व्यक्त केलं.

‘जाऊबाई जोरात’ ते ‘आज्जीबाई जोरात’ या दोन नाटकांमधल्या प्रवासादरम्यान रंगभूमीवर झालेल्या बदलांबद्दल बोलताना निर्मिती सावंत म्हणाल्या, ‘रंगभूमीवर मोठ्या प्रमाणात खूप छान नवीन प्रयोग होत आहेत. मुळात रंगभूमीवर काम करणारी सध्याची तरुण पिढी ही खूप हुशार आहे. विचार करून आपलं काम सादर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे खूप चांगली नाटकं या मधल्या काळात रंगभूमीला लाभली आहेत’. मधल्या काही काळात आता नाटक कोणाकडून लिहून घ्यायचं अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण आताच्या तरुणांना नाटकाची चांगली जाण आहे. नाटककार किती महत्त्वाचा असतो ते माहिती आहे. त्यामुळे नाटक ही आपली संस्कृती टिकवण्याचा ही तरुण पिढी प्रयत्न करते आहे, अशी कौतुकाची पावती निर्मिती सावंत यांनी दिली. तर एकांकिका ते नाटक असा प्रवास करणाऱ्या अभिनयने एकांकिका प्रत्येक नटाला शिकवत असते. एकांकिका करताना रंगमंचाची ओळख करून घेण्यापासून सगळ्या गोष्टी एका कलाकाराला शिकवल्या जातात. अगदी लहानातल्या लहान गोष्टी एकांकिका करताना कळतात. या अनुभवाचा फायदा पुढे व्यावसायिक नाटकात अनुभवी कलाकारांबरोबर काम करताना होतो, असं सांगितलं.