विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक सोशल मीडियावर सक्रिय असतात. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लेकीचा म्हणजेच आराध्या बच्चन ही १० वर्षांची झाली आहे. बॉलिवूडमधील इतर स्टारकिड्सप्रमाणे आराध्या नेहमीच चर्चेत असते. कधीकधी आराध्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. दरम्यान नुकतंच आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना अभिषेकने खडे बोल सुनावले आहेत.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे ‘बॉब बिस्वास’चा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिषेकच्या भूमिकेचे सर्वचजण कौतुक करताना दिसत आहेत. सध्या अभिषेक या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच अभिषेकने बॉलिवूड लाईफ या वेबसाईटला मुलाखत दिली. त्यावेळी त्याला आराध्याला ट्रोल करण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला.

यावर अभिषेक म्हणाला, “मी हे कोणत्याही प्रकारे स्विकारु शकत नाही. ही एक अशी गोष्ट आहे जे मी अजिबात सहन करु शकत नाही. मी एक सेलिब्रेटी असलो तरी माझी मुलगी या सर्व गोष्टींच्या बाहेर आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही माझ्यासमोर येऊन बोला.”

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा विवाह २० एप्रिल २००७ रोजी झाला होता. यानंतर जवळपास चार वर्षांनी १६ नोव्हेंबर २०११ ला आराध्याचा जन्म झाला. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची लेक म्हणजेच आराध्या बच्चन आता दहा वर्षांची झाली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने यंदा तिच्या वाढदिवसानिमित्ताने खास मालदिवची ट्रीप प्लॅन केली होती.

हेही वाचा : “माझी परी आराध्या…”; ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसाचे थाटामाटात सेलिब्रेशन

“माझी परी आराध्या १० वर्षांची झाली. आराध्या तू माझ्या श्वास घेण्याचे कारण आहेस. तू माझे जीवन आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते,” अशी कॅप्शन देत ऐश्वर्याने तिच्या वाढदिवसाचे अनेक फोटो शेअर केले होते. यावेळी आराध्याने छान गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यात ती सुंदर बाहुलीप्रमाणे दिसत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबतत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या दोन मिनिटे एकोणचाळीस सेकंदाच्या ट्रेलरमध्ये बॉब बिस्वासचा प्रवास दाखवण्यात आला आहे. बॉब बिस्वास कोमामधून बाहेर येतो आणि त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याचे दाखवण्यात आले. त्याला त्याचे कुटुंबीय तसेच भूतकाळाविषयी काही माहिती नसते. तो खरच सगळं विसरला आहे की त्यामागे काही कारण आहे हे प्रेक्षकांना चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.