लहानपणापासूनच अभ्यासात मन रमत नव्हते. क्रिकेट आणि अभिनय ही आवड होती. या दोन्हींपैकी अभिनयाची निवड केली. अभिनय क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करायचे होते त्यामुळे वयाच्या १६ व्या वर्षी घर सोडून मुंबईला आलो. मेहनत केली. अभिनयाने आयुष्य जगायला शिकवले, असे मत अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी इंद्रधनु आयोजित रंगोत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
इंद्रधनु आयोजित रंगोत्सव कार्यक्रमात ‘एक मुलाखत नसिरुद्दीन शहा के साथ’ कार्यक्रमाअंतर्गत दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नसिरुद्दीन शहा यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला. नसिरुद्दीन यांच्यावर कोणत्या कलाकाराचा प्रभाव आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना शाळेत इंग्रजी नाटके दाखवली जात. त्या वेळी पडद्यावर दिसणारे केवळ छायाचित्रांचा क्लृप्त्या आहेत, असा भास व्हायचा. हिंदी चित्रपटांमध्ये केवळ दिलीप कुमारचे चित्रपट पाहायची परवानगी होती. अभिनयात उत्कृष्ट योगदान देणारे जेफ्री कँडल हे अभिनयातील गुरू आहेत. त्यांच्यासारखे योगदान कोणीच भारतीय देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
अभ्यास आवडत नसला तरी साहित्याबद्दल आवड होती. कविता वाचणे, नाटक, चित्रपट पाहणे आवडीचे होते. माणूस एकमेकांशी जसे वर्तन करतो हे नेहमी भावले. या निरीक्षणातूनच अभिनय शिकलो. अभिनय करतानाच साहित्याचे वाचन करत होतो. नाटक हे वाचायला नाही अभिनय करायला लिहिले जाते. महेश एलकुंचवार, विजय तेंडुलकरांची नाटके मराठी भाषेसाठीच बनली आहेत. घाशीराम कोतवाल हिंदी भाषेत प्रभावी ठरत नाही, असे मराठी नाटकांविषयी बोलताना त्यांनी सांगितले.
चित्रपट आणि नाटक यांच्यातील सत्यता सारखीच असते. यातील अभिनय माध्यमानुसार बदलावा लागतो, असेही ते म्हणाले. स्वत:वर विश्वास ठेवा, प्रत्येक व्यक्तीकडून शिका असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. सुरुवातीला सतारवादक शेखर राजे आणि त्यांचे सहकारी यांच्या ‘अंतरंग सतारीचे’ या कार्यक्रमाने सोहळ्याला प्रारंभ झाला. या वेळी श्रीधर फडके यांच्या हस्ते सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार डॉ. रेवा नातू यांना प्रदान करण्यात आला. तसेच लघुपट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या वेळी दिग्दर्शक रवी जाधव, विजू माने आदी मान्यवर उपस्थित होते.
वडिलांच्या विरोधात निर्णय
अभिनय क्षेत्रात जाण्याच्या निर्णयाविषयी बोलताना अलिगढ विद्यापीठातून बीए झाल्यावर अभिनय ही एकच गोष्ट नीट करू शकतो याची जाणीव झाली आणि राष्ट्रीय अभिनय शाळेत प्रवेश घेतला. मग कालांतराने वडिलांच्या विरोधात फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय ठरला. तिथे असताना मी निशांत हा पहिला चित्रपट केला. विजयाबाई मेहता यांच्यासोबत नाटक करता आले नाही, अशी खंतही व्यक्त केली.
((((((( प्रसिद्ध अभिनेता नसिरुद्दीन शहा यांचे भावोद्गार )))))