Asrani Danced Video Goes Viral : अभिनेता पंकज धीर यांच्या निधनानंतर, बॉलीवूड अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासह इंडस्ट्रीमधील लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अभिनेत्याचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असरानी नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ त्यांच्या मृत्यूच्या १० दिवस आधीचा असल्याचे सांगितले जात आहे.

गायिका पिंकी मैदासानीने असरानी यांच्याबरोबर सिंधी गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सुरुवातीला असरानी उभे आहेत; पण नंतर तेही डान्स करू लागतात. व्हिडीओ शेअर करताना पिंकी यांनी लिहिले, “शेवटचा कार्यक्रम, फक्त १० दिवसांपूर्वी ते स्टेजवर होते. एका सिंधी गाण्यावर नाचत होते. व्वा, ते किती अदभुत जीवन जगले. खरोखरच एक अदभुत कलाकार, आपले स्वतःचे दिग्गज, असरानी साहेब.”

या व्हिडीओमध्ये असरानी यानी अॅनिमल प्रिंटचा ओव्हरकोट घातलेला दिसतो. ते नाचत आहेत आणि प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने असरानी यांना सर्वोत्तम मनोरंजन करणारा म्हटले आहे. दुसऱ्याने लिहिले आहे, “असरानी यांनी उत्तम चित्रपट बनवले आणि ते एक अदभुत कॉमेडियन होते.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे, “मेहमूदनंतर मला तेच आठवतात.”

असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी होतं. १ जानेवारी १९४१ ला त्यांचा जन्म जयपूरमध्ये झाला. १९६० ला त्यांचं करिअर सुरू झालं, त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचं विनोदाचं टायमिंग आणि अनोखी शैली यांमुळे ते लोकप्रिय ठरले. शोले चित्रपटातील त्यांचं ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ हा डालयॉग असणारी जेलरची भूमिका लोकप्रिय ठरली. ‘खट्टा मिठा’, ‘चुपके चुपके’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या.

अभिनयाबरोबर असरानी यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं. ‘चला मुरारी हीरो बनने’, ‘सलाम मेमसाब’, ‘हम नही सुधरेंगे’, ‘दिल ही तो है’ या नावांचे सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले होते. त्यात जॅकी श्रॉफ यांचा डबल रोल होता आणि दिव्या भारती व शिल्पा शिरोडकर अशा दोन अभिनेत्री होत्या. गुजराती सिनेमांचंही दिग्दर्शन त्यांनी केलं होतं.