Amber Heard welcomes twins : घटस्फोटाच्या खटल्यामुळे चर्चेत राहिलेली ‘अ‍ॅक्वामन’ फेम लोकप्रिय हॉलीवूड अभिनेत्री अँबर हर्डने ‘मदर्स डे २०२५’ ला चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ३८ वर्षीय अँबर जुळ्या मुलांची आई झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा करणाऱ्या अँबरला एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी अपत्ये झाली आहे. तिची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे.

११ मे २०२५ रोजी अँबर हर्डने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटर गुड न्यूज दिली. तिने तिच्या तिन्ही मुलांच्या पायांचा फोटो शेअर केला आणि त्याचबरोबर एक भावनिक कॅप्शन लिहिलं. “मदर्स डे २०२५ हा असा दिवस असेल जो मी कधीही विसरणार नाही,” असं अँबरने लिहिलं.

अँबर हर्डची पोस्ट

पुढे ती म्हणाली, “बऱ्याच वर्षांनी माझं कुटुंब पूर्ण झालं, याचा मला आनंद शब्दात मांडता न येणारा आहे. आज मी अधिकृतपणे ही बातमी शेअर करत आहे की माझ्या हर्ड गँगमध्ये जुळ्या मुलांचं स्वागत केलंय. माझी मुलगी एग्नेस आणि माझा मुलगा ओशन माझं आयुष्य पूर्ण करतात. चार वर्षांपूर्वी जेव्हा मला माझी पहिली मुलगी उनाघ झाली तेव्हा माझे जग कायमचे बदलले. मला वाटलं की यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट काहीच असू शकत नाही. पण आता हा आनंद तिप्पट झाला आहे. माझ्या प्रजननाच्या आव्हानांवर मात करत मी आई झाले, हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. मी हे जबाबदारीने आणि विचारपूर्वक निवडू शकले याबद्दल मी खूप आभारी आहे.आज तुम्ही कुठेही असलात आणि या टप्प्यावर कशाही पोहोचला असाल, माझी कुटुंब (ड्रीम फॅमिली) आणि मी तुमच्याबरोबर आनंद साजरा करत आहोत. खूप प्रेम.”

एप्रिल २०२१ मध्ये अंबर पहिल्यांदा आई झाली होती. तिच्या मोठ्या मुलीचा जन्म सरोगसीद्वारे झाला होता. आता तिने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. मात्र अँबरने तिचा जोडीदार कोण आहे याबद्दल काहीच सांगितलेलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अँबर हर्ड सध्या कोणाला डेट करतेय की नाही याबद्दल काहीच माहिती अद्याप समोर आलेली नाही. अलीकडेच तिचं नाव चित्रपट निर्माता बियान्सी बुट्टीशी जोडलं जात होतं, पण अँबरने स्वतः याबद्दल काहीच सांगितलं नाही. अँबरबद्दल बोलायचं झाल्यास ती तिच्या करिअरपेक्षा घटस्फोटाच्या खटल्यामुळे जास्त चर्चेत राहिली होती. २०१५ मध्ये तिने अभिनेता जॉनी डेपशी लग्न केलं होतं, पण ते वर्षभरातच विभक्त झाले होते. दोघांनी एकमेकांवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करत हाय प्रोफाइल मानहानीचे खटले दाखल केले होते. खटल्याचा निकाल डेपच्या बाजूने लागला, आणि हर्डला १० दशलक्ष डॉलर नुकसानभरपाई व ५ दशलक्ष डॉलर दंडात्मक भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले होते.