“माझ्या राजकीय पोस्ट संदर्भात एका महिलेने तक्रार केली होती त्यावरुन नाराजी दर्शवत मला मालिकेतून काढण्यात आलं”, अशी माहिती अभिनेते किरण माने यांनी दिलीय. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधून अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आलंय. राजकीय भूमिका घेत असल्याचं विचित्र कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र आपल्याला फरक पडत नाही असं सांगत किरण मानेंनी कोणी पाठिंबा दिला नाही तरी मी ही लढाई एकटा लढेन असं, म्हटलंय.

“नेत्यांबद्दल चांगली पोस्ट केल्यावर त्या पक्षाचा झालो असं नसतं. सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं हे सजग नागरिकाचं कर्तव्य आहे. राजकारणावर बोलू नका, लिहू नका असं सांगणं अयोग्य आहे, असं मला वाटतं,” अशा शब्दांमध्ये किरण माने यांनी घडलेला प्रकार अयोग्य असल्याचं सांगतानाच आपण आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचं म्हटलंय.

“कोणी पाठिशी उभं राहिलं नाही तरी मी एकटा लढणार आहे. कोणत्याही सरकारविरोधात बोलणं, पोस्ट करणं हा माझा अधिकार आहे. तंत्रज्ञानाचा वापर नागरिकांच्या सोयीसाठी होणं आवश्यक आहे,” असं म्हणत किरण मानेंनी आपल्या पोस्ट या सर्वच पक्षांविरोधात असतात असं सांगितलं आहे.

नक्की वाचा >> “मी चॅनेल हेड सतीश राजवाडेंना फोन केला, पण…”; किरण मानेंनी सांगितलं ‘त्या’ कॉलनंतर काय घडलं

“मला अश्लील भाषेत ट्रोल केलं जातं. मला कामावरुन काढून टाकलं तर मी खचलोय असं त्यांना वाटतंय. माझ्या पोस्ट खालच्या कमेंट वाचा. हा विखार, ही विषारी भाषा दिवसोंदिवस वाढत चाललेली आहे. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. नाहीतर अराजक माजेल. तुमचं जगणं मुश्कील होईल.आता कसं पाठिशी उभं राहायचं हे तुमचं तुम्ही ठरवात. हे तुमच्या हातात आहे. पण मी झाला लढा सुरु ठेवणार, मी लढत राहणार. यात माझा जीव गेला, बदनामी झाली तरी हरकत नाही,” असं किरण माने म्हणालेत.

“मला आता बदनाम करायचाही प्रयत्न होणार. बदनामी हे त्यांचं मोठं शस्त्र आहे. खोटे आरोप करुन माणसाला बदनाम करणं यात त्यांचा हातखंड आहे. माणसाला बदनाम करायचं, त्याला वेड्यात काढायचं. हे सारं फोफावतं चाललंय. आपण साऱ्यांनी विचार करुन त्याला आळा घातला पाहिजे,” असं किरण माने यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “मला म्हणतात की तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात, पण…”; मालिकेमधून काढल्यानंतर किरण मानेंची रोकठोक प्रतिक्रिया

“मला म्हणतात की तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात.एसटी संपाच्या वेळी मी एसटी कामागारांच्या बाजूने पाठिंबा देणारी पोस्ट लिहिली. तुम्ही ती वाचू शकता. पब्लिक पोस्ट असतात माझ्या. मी राज्य सरकारच्या बाजूने असतो तर ती पोस्ट कशी लिहिली असती? कोणाचंही सरकार आलं तरी मी त्यावर जाब विचारत राहणार कारण हा माझा अधिकार आहे,” असा स्पष्ट शब्दांमध्ये किरण मानेंनी आपली भूमिका मांडलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलाकाराने राजकारणावर बोलू नये असं मला काही जण सुचवतात. तर का बोलू नये कलाकाराने असा माझा प्रश्न आहे, असंही किरण माने म्हणालेत. “मी एक किरण माने म्हणेल की जा मला नाही फरक पडत. पण अनेक लोक असे आहेत की ज्यांचं पोट त्याच्यावर आहे. ते लोक घाबरतात,” असं किरण माने यांनी म्हटलंय. तसेच, “मला चॅनेलवर पण आक्षेप नाही. त्यांच्यावर कोणीतरी दबाव आणलाय. या दबावावर पण उत्तर देऊयात जेणेकरुन या सगळ्याचा पुन्हा विचार केला जाईल,” असं मत किरण मानेंनी मांडलंय.