Raza Murad on Rumous of his death: आपल्या खर्जातल्या आवाजात संवादफेक करणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद हे सध्या एका फेक सोशल मीडिया पोस्टमुळे त्रासलेले आहेत. माझा मृत्यू झाल्याची बतावणी करून वारंवार काही जण सोशल मीडियावर श्रद्धांजलीची पोस्ट करत असतात, त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत रझा मुराद यांनी अखेर मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “मी जिवंत आहे, हे सांगून सांगून माझा घसा कोरडा झाला”, अशी खंत यावेळी रझा मुराद यांनी व्यक्त केली.
पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत रझा मुराद म्हणाले की, मी अफवांचे स्पष्टीकरण देऊन आता थकलो आहे. वारंवार माझ्या मृत्यूबद्दल सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या जातात. ज्यामुळे मला आणि कुटुंबियांना स्पष्टीकरण देत बसावे लागते. आता पुन्हा कुणीतरी माझ्या मृत्यबद्दल पोस्ट टाकली. तसेच त्याने माझ्या फोटोखाली माझी जन्मतारीख आणि मृत्यूची तारीखही लिहिली होती.
“काही लोकांना माझ्या अस्तित्त्वाचा त्रास होत असावा. त्यामुळे ते माझ्या मृत्यूची पोस्ट टाकून श्रद्धांजली व्यक्त करत असतात. ते लिहितात की, मी खूप वर्ष सिनेसृष्टीत काम केले. पण आता मला कुणीही ओळखत नाही. हे लोक संबंधित पोस्टमध्ये माझी जन्मतारीख आणि मृत्यूची तिथीही टाकतात आणि हे खूप गंभीर प्रकरण झाले आहे”, असे रझा मुराद म्हणाले.
मी जिवंत आहे, हे सतत सांगून आता थकलो आहे, असे सांगताना रझा मुराद पुढे म्हणाले की, मी जिवंत असल्याचे लोकांना सांगून सांगून आता माझा घशा, जीभ आणि ओठ सुकले आहेत. खोट्या पोस्ट व्हायरल झाल्यामुळे मला जगभरातून फोन आणि मेसेजेस येत आहेत. तसेच या पोस्टचे स्क्रिनशॉट लोक मलाच पुन्हा पुन्हा पाठवत आहेत.
अशा पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीची मानसिकता अतिशय तुच्छ असावी. त्यांनी आयुष्यात कधीही काहीही केले नसावे. म्हणूनच त्यांना अशा निकृष्ट गोष्टी करण्यात मजा येत असावी. पण मी मात्र आता त्यांना सोडणार नाही. अन्याय करण्याची जशी एक सीमा असते, तसेच अन्याय सहन करण्यालाही काही मर्यादा असतात. त्यामुळे मी आता अशी आगळीक करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला असून त्यांची तक्रार दाखल केली आहे, असेही रझा मुराद म्हणाले.
कोण आहेत रझा मुराद?
१९५० साली जन्मलेल्या रझा मुराद यांनी १९७० च्या दशकात हिंदी सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. आजवर त्यांनी विविध भाषांमधील २५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांचा खोल आवाज, चेहऱ्यावरील धीरगंभीर मुद्रा आणि त्यांनी रंगवलेले चरित्रात्मक आणि खलनायकाची पात्रे लोकप्रिय झाली आहेत. अलीकडच्या पद्मावत सारख्या चित्रपटातून नव्या पिढीलाही त्यांचा अभिनय पाहता आला होता.