दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थचा बंगळुरूतील एक कार्यक्रम बंद पाडल्याची घटना शनिवारी समोर आली होती. तामिळनाडू व कर्नाटकमध्ये कावेरी नदीच्या वाटपावरून राजकारण तापलं आहे. दोन्ही राज्यात आंदोलनं सुरू आहेत. अशातच आपल्या चित्रपटाचं प्रमोश करण्यासाठी बंगळुरूला गेलेल्या सिद्धार्थच्या कार्यक्रमात कन्नड समर्थक आंदोलक घोषणाबाजी करत पोहोचले. त्यानंतर त्याला कार्यक्रम सोडून जावं लागलं होतं. या घडलेल्या प्रकारावर अभिनेत्याने मौन सोडलं आहे.

Video: राजकीय वादाचा सिनेमाला फटका, आंदोलकांनी गोंधळ घालत अभिनेता सिद्धार्थचा कार्यक्रम पाडला बंद

इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये सिद्धार्थ म्हणाला, “काल बंगळुरूमध्ये एक घटना घडली. त्याची पार्श्वभूमी अशी की चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी निर्माता म्हणून मी माझा चित्रपट अनेकांना दाखवला. चेन्नई आणि कोची येथील माध्यमांनाही दाखवला. बेंगळुरूमध्येही असाच शो करायचा आमचा प्लॅन होता. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना दाखवण्याची माझी योजना होती. असं आजवर कोणीही केलेलं नाही. त्याच रात्री कन्नड कलाकारांनाही मी चित्रपट दाखवणार होतो. पण बंदचा सन्मान म्हणून आम्ही सर्व कार्यक्रम रद्द केले. आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे, पण त्यापलीकडे आम्ही एक चांगला चित्रपट तिथल्या लोकांबरोबर शेअर करू शकलो नाही याचं जास्त वाईट वाटलं.” इंडियन एक्सप्रेसने याबद्दल वृत्त दिलंय.

“सेन्सॉर सर्टिफिकेट्ससाठी ६.५ लाख मागितले,” अभिनेत्याच्या तक्रारीवर मोदी सरकारने दिलं उत्तर; म्हणाले,”घडलेला प्रकार…”

“पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांना चित्रपट दाखवण्यात येणार होता. पण तिथे काय घडलं ते तुम्ही सर्वांनी पाहिलं. हे सगळं तिथं कॅमेऱ्यांसमोर घडले. त्यामुळे मला त्या बद्दल बोलायचं नाहीयं. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, म्हणून मला लक्ष विचलित करण्यासाठी काहीही बोलायचं नाही. माझ्या चित्रपटाचा आणि प्रकरणाचा काहीही संबंध नाही. मला विश्वास आहे की मी माझे पैसे खर्च करून बनवलेल्या चित्रपटामध्ये माझी सामाजिक जबाबदारी दिसून येईल,” असं सिद्धार्थ म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय घडलं होतं?

सिद्धार्थचा ‘चिठ्ठा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तो कर्नाटकमध्येही प्रदर्शित होत असल्याने अभिनेता बंगळुरूमध्ये प्रमोशनसाठी गेला होता. पण कावेरी नदीच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादामुळे काही कन्नड समर्थक आंदोलक सिद्धार्थच्या कार्यक्रमात पोहोचले आणि गोंधळ घातला परिणामी त्याला पत्रकार परिषद अर्ध्यात सोडावी लागली. या घडलेल्या प्रकारानंतर प्रकाश राज यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच कन्नड अभिनेता शिवराज कुमारनेही सिद्धार्थची माफी मागितली होती.