लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलने दीड वर्षांपूर्वी २०२३ मध्ये लग्न केलं. तिच्या पतीचं नाव जगत देसाई आहे. अमाला केरळची असून जगत गुजराती आहे. अमाला लग्नानंतर ७ महिन्यांनी आई झाली. तिने मुलाला जन्म दिला. अमाला म्हणाली की तेव्हा ती एका कठीण काळातून जात होती आणि तिला स्वतःशी कसं जुळवून घ्यायचं हे समजत नव्हतं. पण गरोदर राहिल्याने तिला आयुष्यात दिशा मिळाली.
मुलाखतीत अमाला म्हणाली, “मी अशा वेळी गरोदर राहिले जेव्हा मला आयुष्यात काय करायचंय हे माहित नव्हतं. पण त्या अनुभवाने मला दिशा दाखवली आणि मला एक चांगली व्यक्ती व्हायला मदत केली. माझ्या आतला तो छोटासा जीव माझ्यासाठी सर्वकाही होता. मला कळलंच नाही की माझ्यातला ‘मी’ कुठे गेला, पण मला तो अनुभव फार चांगला वाटला.”
अमाला पॉल (Amala Paul got pregnant before marriage) म्हणाली की ती आणि तिचा जोडीदार जगत देसाई एकत्र येऊन काही महिनेच झाले होते आणि त्याचदरम्यान तिला समजलं की ती गरोदर आहे. “लग्न खूप नंतर झाले,” असं अमालाने सांगितलं. जगत हा आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद, सर्वात मोठी भेट आहे, असं म्हणत अमालाने पतीचं कौतुक केलं.
अमालाला जाणवत होती स्किझोफ्रेनियाची लक्षणं
२०२०-२१ मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर करोनाची साथ आली आणि त्याचे खूप भावनिक परिणाम अमालावर झाले. अमाला आयुष्यात भावनिक आघाडीवर खूप संघर्ष करत होती. तिला स्किझोफ्रेनियासारखी लक्षणं देखील जाणवत होती. एका हिंदी सीरिजमध्ये तिने तोच आजार असलेले पात्र केले होते. पण तेव्हा ती केवळ एक भूमिका होती आणि नंतर मात्र खऱ्या आयुष्यात तिला ते जाणवू लागलं. “मी माझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांची नावं विसरत होते. एवढा ताण मला येत होता,” असं अमाला म्हणाली.
काही काळ भावनिक संघर्ष केल्यानंतर अमालाने त्यातून बाहेर पडायचं ठरवलं. ती बाली, थायलंड, श्रीलंका आणि लंडन या देशांमध्ये एकटीच फिरली. त्यामुळे तिला भावनिक आव्हानांवर मात करता आली. “तुम्ही इतरांवर अवलंबून राहू शकत नाही ते तुम्हाला येऊन वाचवतील, तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतः शोधावा लागेल,” असं अमाला म्हणाली.
अमालाचं पहिलं लग्न अन् घटस्फोट
अमाला पॉलने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी जगत देसाईशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. जून २०२४ मध्ये ती एका गोंडस मुलाची आई झाली. अमालाचा पती जगत मूळचा सुरतचा असून तो गोव्यातील एका प्रसिद्ध लक्झरी व्हिलामध्ये मॅनेजर म्हणून काम करतो.
अमालाचे पहिले लग्न तमिळ दिग्दर्शक एएल विजयशी झाले होते, पण तीन वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. २०१४ मध्ये या जोडप्याने लग्न केलं आणि काही गैरसमजांमुळे २०१७ मध्ये त्यांच्या घटस्फोट झाला.