२०१६ या वर्षात अभिनेत्री कंगना रणौत विविध कारणांनी चर्चेत आली होती. कंगना नेहमीच तिच्या ठाम वक्तव्यांसाठी आणि निर्भिड भूमिकांसाठीही ओळखली जाते. कोणाच्या नावाच्या पाठिंब्याशिवाय या अभिनेत्रीने आज हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची अशी एक ओळख निर्माण केली आहे. कंगनाच्या चाहत्यांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. तिच्या चित्रपटांप्रमाणेच खासगी जीवनाविषयीही नेहमीच अनेक चर्चांना उधाण येत असते. यंदाच्या वर्षी कंगना तिच्या आगामी चित्रपटांच्या कामात खुपच व्यग्र होती. कामासोबतच कंगना चर्चेत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे हृतिकसोबत सुरु असलेला तिचा वाद.

हृतिकसोबत झालेल्या वादामुळेही कंगना बरीच प्रकाशझोतात आली होती. आता मात्र याबाबतच्या चर्चांचे वादळ शमले असले तरीही कंगनाने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. एका मुलाखतीदरम्यान कंगनाने २०१७ मध्ये विवाहबद्ध होण्याचा खुलासा केला आहे. मिड डेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एका चॅट शो दरम्यान कंगनाने हे वक्तव्य केले. पण, ती नेमकी कोणासोबत लग्न करणार हे विचारले त्यावेळी मात्र तिने ‘त्या’ नावाचा खुलासा केला नाही. त्यामुळे आता कंगना खरंच २०१७ मध्ये विवाहबद्ध होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘क्वीन’ कंगनाने या कार्यक्रमादरम्यान तिच्या व्यक्तिमत्त्वाविषयीही चर्चा केली. कंगना यावेळी असेही म्हणाली की, मी माझ्या चुकांमधून शिकत नाही. मी याच मार्गाचा अवलंब गेल्या बऱ्याच वर्षांपासून करत आहे. नात्यांमध्ये आपल्याला फारसे यश मिळाले नसले तरीही मी प्रेमावर नेहमीच विश्वास ठेवते असंही कंगना म्हणाली. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कंगनाचे नाव आदित्य पांचोलीसोबत जोडले गेले होते. पण, कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा आला. ‘राज २’ या चित्रटपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंगनाचे नाव शेखर सुमन यांच्या मुलासोबत म्हणजेच अध्ययन सुमनसोबत जोडण्यात आले होते. पण, त्याच्यासोबत असलेल्या नात्यांविषयी कंगनाने अपेक्षित उत्तर दिले होते. त्यानंतर कंगना एका यूकेस्थित डॉक्टरला डेट करत असल्याचेही म्हटले जात होते. आजवरच्या बॉलिवूड कारकीर्दीत कंगनाचे नाव अनेकांसोबत जोडले गेले असल्यामुळे आता ती कोणाशी विवाहबद्ध होणार याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे.

कंगना लवकरच विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या तयारीत अभिनेत्री कंगना रणौतने स्वत:ला झोकून दिले होते. चित्रपटात सैफ अली खान आणि शाहिद कपूर हे अभिनेते तिचे सह-कलाकार म्हणून दिसणार आहेत. चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी कंगना घोडेस्वारी आणि बॅले नृत्यप्रकारासाठी कठोर परिश्रम करताना दिसली होती.