अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेचा विषय बनत असते. शरद पावर यांच्याविरोधात केलेल्या एका पोस्टमुळे गेल्या काही महिन्यांपासून ती सातत्याने चर्चेत राहिली आहे. दरम्यान त्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे केतकीला तुरुंगवासही भोगावा लागला. तिच्याविरोधात महाराष्ट्रातून २२ एफआयआर दाखल करण्यात आले होते. त्यासोबतच तिला तिच्या फेसबुक अकाउंटचा वापर करण्यालाही मनाई करण्यात आली होती. यानंतर आता तिला पुन्हा एकदा तिचे फेसबुक अकाउंट परत मिळाले आहे. फेसबुक अकाउंट परत मिळाल्या मिळाल्या तिने फेसबुकवरुन एक पोस्ट करत याविषयी आनंद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ ठरला आयएमडीबी साईटवर सर्वात कमी रेटिंग्स मिळवणारा चित्रपट

केतकीने पोस्ट केली की, “अखेर मला माझ्या फेसबुकचा ॲक्सेस परत मिळाला आहे: निदान सध्यापुरता तरी…” तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे. १३ मे २०२२ रोजी तिने शरद पवारांच्या विरोधात एक अक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर तिचे फेसबुक अकाउंट तिच्याकडून काढून घेण्यात आले होते. त्यानंतरची तिची ही नवीन पोस्ट २९ ऑगस्ट २०२२ ची आहे. काही तासांपूर्वी शेयर केलेल्या या पोस्टला हजारो नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. त्यात अनेकांनी केतकीचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी केतकीला काळजी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे केतकीला तिच्या फेसबूकचं लॉग इन पुन्हा मिळाल्यानंतर तिच्या भूमिकेकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 4 : “मी पैशासाठी माझा दर्जा…” ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबद्दलच्या चर्चांवर केतकी चितळेचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळे ४१ दिवस तुरुंगात होती. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक झाल्यानंतरही ती तिच्या भूमिकेवर ठाम होती. तिने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्येही तिच्यासह घडलेला प्रकार बेयादेशीर होता असे म्हटले आहे. तरी अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.