Shaky Song Dance Video : सोशल मीडियावर सध्या संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. अवघ्या महिनाभरात या गाण्याला सर्वांची पसंती मिळाली आहे. सामान्य नेटकऱ्यांपासून ते मोठमोठ्या बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला या गाण्याची भुरळ पडली.

संजूच्या या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये ‘शेकी’ हे गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. संजू राठोडच्या याआधीच्या ‘गुलाबी साडी’, ‘काली बिंदी’ या गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळाला होता.

अनेक कलाकारांना ‘शेकी’ या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स केला आहे. त्यात आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे, ही अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित.

माधुरी दीक्षितने शेअर केला ‘शेकी’ डान्स व्हिडीओ

माधुरी दीक्षितला संजूच्या शेकी गाण्याची भुरळ पडली आहे. या ट्रेंडिंग गाण्यावर माधुरी दीक्षितने जबरदस्त डान्स केला आहे. माधुरी दीक्षितने यावेळी गुलाबी रंगाची सुंदर साडी, केसात गुलाबाचं फूल आणि गळ्यात नेकलेस असा लूक केला होता. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.

बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. तिचं हास्य, नृत्य आणि दमदार अभिनयामुळे माधुरीने तिच्या चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ९० च्या दशकात ‘तेजाब’, ‘खलनायक’, ‘राम लखन’, ‘दिल तो पागल हैं’, ‘हम आपके है कौन’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपटांमध्ये माधुरीने काम केलेलं आहे. तिने नुकताच शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. माधुरीच्या या रीलला चाहत्यांकडूनही चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

माधुरीच्या डान्सचं चाहत्यांनी केलं कौतुक

लोकांनी या डान्स व्हिडीओवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओला चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “एक नंबर”, “फायनली तुम्ही हा ट्रेंड केला”, “खूप सुंदर दिसत आहात”, “एक नंबर मोहिनी” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

हिंदी ‘बिग बॉस’फेम ईशा मालवीयने या गाण्यात केलेल्या डान्सने गाण्याची लोकप्रियता आणखीनच वाढवली आहे. या गाण्यातील तिची हुकस्टेप आणि याच हुकस्टेप्सवरील रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.