बॉलीवूडची ‘बबली’ राणी मुखर्जीने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ९० च्या दशकात चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या या अभिनेत्रीने सलमान खान, आमिर खान व शाहरुख खान या खान त्रयीसोबत काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा राणीचा अनुभव अद्भुत राहिला आहे.

सलमान खानच्या तुलनेत राणीने शाहरुख व आमिर खानसोबत जास्त हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्रीने एका मुलाखतीतही हे सांगितले होते. त्यासोबतच तिने हेदेखील सांगितले की कोणत्या दोन कलाकारांच्या चित्रपटांमध्ये ती बॅकस्टेजवर डान्स करण्यास तयार होईल.

राणी या सुपरस्टार्सची आहे फॅन…

लोकप्रिय शोमध्ये राणीने सांगितले, “शाहरुख खान आणि आमिर खान हे दोन असे स्टार आहेत, ज्यांच्याकडून ती अभिनयाच्या जगात खूप काही शिकली आहे. या दोन कलाकारांनी राणी मुखर्जीला खूप मदत केली होती”, असेही तिने सांगितले. राणी म्हणाली, ती आमिर खानचा ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट पाहून मोठी झाली आहे. राणी मुखर्जी जेव्हा आमिर खानबरोबर पहिल्यांदा काम करत होती, तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. राणीने पहिल्यांदा आमिरसोबत १९९८ मध्ये आलेल्या ‘गुलाम’ चित्रपटात काम केले होते.

या मुलाखतीत राणी मुखर्जीने हेदेखील मान्य केले की, जर शाहरुख खानने तिला मध्यरात्री जरी कामासाठी फोन केला, तरी ती नकार देणार नाही. राणीचा शाहरुखसोबतचा पहिला चित्रपट होता ‘कुछ कुछ होता है’. हादेखील एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. ‘कुछ कुछ होता है’नंतर राणी शाहरुखसोबत ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’, ‘वीर जारा’, ‘पहेली’ व ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटांत दिसली होती.

राणीने आमिरसोबत ‘गुलाम’ व ‘तलाश’ हे चित्रपट केले आहेत. राणी मुखर्जी शेवटची ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ या चित्रपटात दिसली होती आणि आता ती ‘मर्दानी ३’मध्ये दिसणार आहे. ‘मर्दानी ३’ होळीच्या मुहूर्तावर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.