बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर ‘ओके जानू’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘आशिकी २’ या चित्रपटातून तरुणाईमध्ये छाप पाडलेली जोडी एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. या चित्रपटाप्रमाणेच या दोघांमध्ये धमाल केमिस्ट्री पाहावयास मिळेल अशी त्यांच्या चाहत्यांची नक्की अपेक्षा असेल. मात्र, कुठेतरी आता सतत दिसत असलेल्या प्रेमकथेवर आधारित असा हा ‘ओके जानू’ चित्रपट. या चित्रपटाच्या कथेत फारसे नाविन्य असे काहीच दिसून येत नाही.
चित्रपटामध्ये नसरुद्दीन शहा( गोपी) आणि लीला सॅमसन (चारु) या पती-पत्नींचे प्रेम आणि आदित्य राय (आदी)- श्रद्धा कपूर (तारा) यांच्यातील नाते विरोधाभास दाखविणारे आहे. मर्यादेला न जूमानता बिनधास्त जगण्याचा चित्रपटातील प्रवास शेवटी जितक्या सुलभपणे दाखविण्यात आलेला आहे, तो न रुचणारा असाच आहे. काही ठिकाणी विनोद करण्याचा प्रयत्न फसलेला दिसतो. वेगळेपण असे काहीच नसल्यामुळे श्रद्धा आणि आदित्य या जोडीला या चित्रपटामुळे नवीन चाहता निर्माण होईल, असे वाटत नाही.

मणी रत्नम यांच्या ‘ओक कनमानी’चा रिमेक असलेल्या या चित्रपटात रोमान्स दाखविण्यासाठी जो काही मालमसाला हवा तो सगळा आहे. सुंदर दिसणारे प्रेमीयुगुल, प्रेमींना आवडतील असे संवाद, गाणी, नृत्य, नयनरम्य ठिकाण पण तरीही हा चित्रपट कुठेतरी कमी पडतो.
चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर आणि अदित्य राय यांची केमिस्ट्री कमाल दिसली असली तरी अभिनयात फारसा दम वाटत नाही. या नव्या चेहऱ्यांपेक्षा नसरुद्दिन शहा यांची भूमिका अधिक दमदार दिसते. पूर्ण कथानक नव्या पिढीच्या जीनवशैलीची रुची दाखविणारे असले तरी नसरुद्दीन शहा यांची भूमिका ही नव्या पिढीच्या विचारांसमोर एक आदर्श निर्माण करतानाचे चित्र दिसते.  ‘आशिकी २’ नंतर या दोन्ही कलाकारांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा यामुळे हे दोघेही चर्चेत राहिले. मात्र त्याचा या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत काही परिणाम होईल, असे वाटत नाही. अर्थातच टाइमपास म्हणून चित्रपटगृहात वेळ घालविण्यासाठी चित्रपट ‘ओके’ आहे असचं म्हणता येईल.

या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर ‘तारा’च्या भूमिकेतून नव्या विचाराच्या प्रेमात बिनधास्तपणे वावरताना दिसते. चित्रपटाची सुरुवात ही आदित्य रॉयच्या रंजक अशा स्वप्नाने होते. श्रद्धा कपूर आणि आदित्य राय यांच्यातील प्रेमाचा प्रवास सुरु होण्यापूर्वी आदित्यने (आदि) एक स्वप्न पाहतो. या स्वप्नांना अॅनिमेटड स्वरुपात प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले आहे. आपले हे स्वप्न घेऊन तो स्वप्नांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईत दाखल होतो. या ठिकाणीच त्याला श्रद्धा कपूर (तारा)चे ओझरते दर्शन होते. दोघांमध्ये एका प्लॅटफॉर्मचे अंतर त्यातही फ्लॅटफॉर्मवर असणारी रेल्वे यात श्रद्धाचा रेल्वेखाली जीव देण्याचा ड्रामा दिसून येतो.

पुढे त्यांची भेट होते ते एका कॉमन मैत्रिणीच्या लग्नात चर्चमध्ये ‘ओय..ओय…’अशा संभाषणात दोन टोकांना बसलेल्या या जोडीची ओळख होते. हाय बायच्या या भेटीत लग्नानंतर मैत्रीणीच्या आयुष्यात काय घडणार यासंदर्भात चर्चा रंगते. तेव्हाच दोघेही लग्नाच्या विरोधात असल्याचे दिसते. दोघांचे विचार मिळाल्यानंतर श्रद्धा कपूर आदित्यला त्याच्या आतापर्यंत आयुष्यात आलेल्या प्रेयसींचा आकडा विचारते. यावेळी त्याने पंधरा हे उत्तर दिल्यानंतर मी सोळावी का? असे विचारत दोघांमधील नाते फुलण्यास सुरुवात होते. यावेळी आदित्य रायही रेल्वे स्थानकावर तिच्यासोबत असणाऱ्या तरुणाबद्दल विचारतो. तो तिचा प्रियकर असल्याचे समजल्यानंतर तुमच्यात आतापर्यंत काय काय झाले? या प्रश्नाला श्रद्धा कपूर (तारा) ने दिलेले उत्तर वेगळ्या दुनियेत जगणाऱ्या मुलीचे दर्शन देणारे आहे.

यापूर्वी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ‘हम्मा हम्मा’ या गाण्यात गुजरातमध्ये तारा आणि आदिने केलेल्या धमाल मस्तीनंतर तिच्या आईने तिच्यारावर केलेल्या प्रश्नांची बरसात ही नव्या पिढीमध्ये फुलणाऱ्या आणि सध्याच्या घडीला तरुणाईमध्ये कुतूहल असणाऱ्या ‘लिव्ह इन रिलेशन’बद्दल पालकांमधील चिंता दाखवून देण्याचा  प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला दिसतो. वयाच्या सातव्या वर्षी आई-वडिलांच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्यामुळे तारा लग्न या संकल्पनेच्या विरोधात आहे का? असाही कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर मर्यादेपलीकडे जगण्याचा एक संदेश घेऊन ही जोडी वास्तविक जगात चाललेल्या प्रकाराला पडद्यावर उतरविण्याचा प्रयत्न करताना दिसते. चित्रपटात श्रद्धा हे अभियंत्याचे स्वप्न बाळगून पॅरिसला जाण्यासाठी विचारात असते. तर दुसरीकडे आदित्य गेमचा अविष्कार करुन अमेरिकेला जाण्याचे स्वप्न बाळगून असतो. भावनिकतेमध्ये स्वप्न अपूरे राहू नये, यासाठी नात्यामध्ये लग्न या संकल्पनेत न अडकता एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करता जगण्याला प्राधान्य देऊन ही जोडी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहताना दिसते.

विशेष म्हणजे ही जो़डी ज्या छताखाली आपले हे स्वप्न जगण्याचे ठरविते ते घर असते नसरुद्दीन शहा यांचे. विसरभोळ्या पत्नीच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या नसरुद्दीन शहा यांना नव्या पिढीची ही जीवनशैली अजिबात रुचत नाही. नसरुद्दीन शहा यांनी या चित्रपटात अदित्य रायच्या घरमालकाची भूमिका साकारली आहे. ते या दोघांना एकत्र राहण्याची परवानगी नाकारतात. पण यावेळी शास्रीय संगीतात दंग असणाऱ्या नसरुद्दीन (गोपी ) यांच्या पत्नीला ताराची शास्रीय संगीतातील आवड प्रभावित करते. त्यानंतर तिला त्या घरात प्रवेश मिळतो. नसरुद्दीन शहा आणि पत्नी चारु यांचे प्रेम पाहून नव्या जमान्यात बिनधास्त जगण्याचा निर्णयामध्ये परिवर्तन होण्यास सुरुवात होते. दूर न जाण्यासाठी शेवटी दोघे लग्नाचा विचार करतात. अर्थात इथपर्यंतचा प्रेमाचा बिनधास्त प्रवास लग्नाच्या विचारात अडकवून एक वेगळेपण दाखविण्याच्या प्रयत्नाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट चित्रपटात नाविण्य दिसत नाही.