दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाने जगभरात तुफान कमाई करत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ‘पुष्पा’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. हिंदीमध्ये या चित्रपटाला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला. त्यामुळे श्रेयसचे कौतुक होत आहे. दरम्यान, आता श्रेयस तळपदेने त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
श्रेयसने काल २७ जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला. त्या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘आपडी थापडी’ असे असून यामध्ये तो अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत दिसणार आहे. त्यासोबतच संदीप पाठक, नंदू माधव, खुशी हजारे, नवीन प्रभाकर ही तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.
Video: उत्तर कोरियाचा हुकूमशहा ‘किम जोंग उन’चा देशी अवतार ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर
एक मिनिटाच्या टीझरमध्ये कोणाचाही चेहरा न दाखवता मुलगी, बाबा आणि आई यांच्यामध्ये सुरु असलेले संवाद दाखवण्यात आले आहे. श्रेयसने ‘आपडी थापडी’ चित्रपटाचे टीझर शेअर करत चित्रीकरणास सुरुवात केल्याची माहिती दिली आहे. ‘आजच्या दिवशी आपणा सर्वांसाठी एक खास भेट. माझ्याबरोबरच आपलं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या या नवीन बाळालाही लाभो… हीच बाप्पा चरणी प्रार्थना’ या आशयाचे कॅप्शन त्याने टीझर शेअर करत दिले आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर चर्चेत आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.