रक्षाबंधन हा एक असा सण आहे की, जो कोणत्याही रक्ताच्या नात्याशी किंवा धर्माशी संबंधित नाही, तर भाऊ आणि बहिणीशी संबंधित आहे. मग ते नाते रक्ताचे असो किंवा हृदयापासून बनलेले असो.
असेच काहीसे ऐश्वर्या राय बच्चनच्या बाबतीत घडले आहे. तिने सोनू सूदला राखी बांधली आणि एक नाते सुरू केले, जे अजूनही चालू आहे. दोघांचे हे प्रेमळ नाते २००८ मध्ये आशुतोष गोवारीकर यांचा ऐतिहासिक चित्रपट ‘जोधा अकबर’च्या सेटवर सुरू झाले, जो भाऊ व बहिणीमधील प्रेम आणि आदराचे एक अनोखे उदाहरण आहे.
या चित्रपटात ऐश्वर्याने महाराणी जोधाबाईची भूमिका केली होती आणि सोनूने तिचा भाऊ कुंवर सुजामलची भूमिका केली होती, जो आपल्या बहिणीसाठी आपले राज्य पणाला लावण्यास तयार होता. पडद्यावरची ही भावा-बहिणीची केमिस्ट्री वास्तविक जीवनात एका सुंदर नात्यात बदलली.
राखी बांधण्याचे हे नाते ‘जोधा अकबर’च्या चित्रीकरणादरम्यान सुरू झाले, जेव्हा ऐश्वर्या सोनूला सेटवर राखी बांधत असे. तेव्हापासून सोनू प्रत्येक रक्षाबंधनाला ऐश्वर्याला भेटायला जातो आणि ती त्याला राखी बांधते. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत, सोनूने ‘जोधा अकबरच्या सेटवरील एक गोड आठवण सांगितली होती, ज्यामध्ये सोनूने सांगितले होते की, सुरुवातीला संकोच करणाऱ्या ऐश्वर्याने एका दृश्यादरम्यान त्याला म्हटले होते, “तुम्ही मला माझ्या वडिलांची (अमिताभ बच्चन) आठवण करून देता” त्याने असेही सांगितले की, ती त्याला प्रेमाने ‘भाईसाहब’ म्हणते.
सोनू सूदचे बच्चन कुटुंबाशी असलेले नाते केवळ ऐश्वर्यापुरते मर्यादित नाही. त्याने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘बुड्ढा… होगा तेरा बाप’ आणि अभिषेक बच्चनबरोबर ‘युवा’ व ‘हॅपी न्यू इयर’मध्ये काम केले आहे. ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सोनूने बच्चन कुटुंबाचे कौतुक केले होते आणि म्हटले की, ते अद्भुत लोक आहेत, ज्यांच्याशी त्याची खूप चांगली मैत्री आहे.
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद ने आजवर अनेक उत्कृष्ठ चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्याने १९९९ मध्ये ‘कल्लाझागर’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती, त्यानंतर सोनूने ‘कहां हो तुम’, ‘युवा’, ‘आशिक बनाया आपने’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. सोनू सूदने हिंदी सिनेमांव्यतिरिक्त तेलुगू, तामिळ आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही अभिनय केला आहे.