‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ असे जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिल्यानंतर प्रसाद ओक आता ‘चंद्रमुखी’ हा बहुचर्चित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट २९ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या चर्चेत आहे.

टीझरमध्ये ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना दिसत आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ या चित्रपटात पाहायला मिळत आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय रशीली प्रेमकहाणी प्रेक्षकांना ‘चंद्रमुखी’मध्ये पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा : गरोदरपणातील फोटोंवरुन ट्रोल करणाऱ्याला काजल अग्रवालचे सडेतोड उत्तर, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय – अतुल या दमदार जोडीने ‘चंद्रमुखी’ला संगीत दिले आहे. या चित्रपटातील ‘चंद्रमुखी’आणि इतर कलाकारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. हा चित्रपट २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.