सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री व गायिका अक्षरा सिंह कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. हिंदी ‘बिग बॉस’मुळे लोकप्रिय झालेली अक्षरा तिचा खासगी एमएमएस व्हायरल झाल्यानंतर खूप चर्चेत होती. काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली. या घटनेनंतर अक्षराने तिचा एमएमएस व्हायरल झाल्याच्या अफवेबद्दल भाष्य केलंय.
Video: अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात शाहरुख खानचं गौरीशी जोरदार भांडण? ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘आज तक’शी बोलताना अक्षरा म्हणाली, “मी सध्या बस्तीमध्ये आहे आणि इथे एका चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मी ती अफवा वाचली आणि खूप अस्वस्थ झाले. मला वाटलं आता हे सगळं थांबेल, पण तसं होत नाही. मी इथे कामासाठी सतत धडपडत असते आणि अशा बातम्या मला अस्वस्थ करतात. माझ्या कामाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून माझा संघर्ष सुरू आहे. पूर्वी अशा बातम्या यायला लागल्या की वाटायचे, जाऊ द्या, कोण कायदेशीर कारवाईच्या भानगडीत पडणार, पण आता लोक माझ्या गप्प बसण्याचा फायदा घेऊ लागले आहेत. प्रत्येकाची सहन करण्याची मर्यादा असते, किती दिवस सहन करायचे,” असा सवाल तिने केला.
अक्षरा म्हणाली, “आधीपासूनच एक गँग २०१८ पासून माझ्या मागे लागली आहे. इथे काम करू देत नाही. मी दुसरी आकांक्षा दुबे व्हावे अशी त्यांची इच्छा आहे का? या सगळ्या गोष्टींना कंटाळून मी स्वतःला फाशी घ्यावी का? मग कदाचित त्यांना दिलासा मिळेल. लोकांना हेच हवंय, हे मला चांगलं माहीत आहे, पण मी त्यांची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही.”
अक्षराने गंभीर आरोप करत होणाऱ्या त्रासाचा खुलासा केला. “२०१८ पासून माझ्या कामात मला दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पण मी हिंमत हारली नाही, मी ठरवलं आहे की काहीही झालं तरी मला खंबीर राहायचं आहे. संकटात असूनही मी स्वतःची हिंमत टिकवून ठेवली आहे. मी काम करत आयुष्यात पुढे जातेय, जेणेकरुन जे माझ्याकडे प्रेरणा म्हणून पाहतात त्यांच्यासाठी मी एक उदाहरण राहू शकेन. मला माहीत आहे की इंडस्ट्रीतील लोक कसे एक गट तयार करून एका अभिनेत्रीला त्रास देतात, तिचा छळ करतात, तिला कामासाठी संघर्ष करायला लावतात. हे सहन करून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे,” असं अक्षरा म्हणाली.