एका वर्षातल्या निव्वळ जाहिरातीतून मिळणाऱ्या कमाईचा विचार केला तर अक्षय कुमारने बॉलिवूडमधील ‘खान’दानाला मागे टाकल्याचे समोर आले आहे. २०१८ साली जाहिरातीतून मिळवलेल्या उत्पन्नाच्या यादीत अक्षय कुमारचे नाव पहिल्या क्रमांकावर असून पहिल्या पाच नावांमध्ये ‘खान’ घराण्यातील एकाही अभिनेत्याचा समावेश नाहीये. २०१८ मध्ये अक्षय कुमारने जाहिरातीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. या यादीत शाहरुख व सलमानला मागे टाकत आलिया भट्टही पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे ही आश्चर्याची बाब आहे.

अक्षय कुमारने सगळ्यांना मागे टाकत या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर रणवीर सिंग आहे. रणवीर सिंग (८४ कोटी),दीपिका पदुकोण (७५ कोटी),अमिताभ बच्चन (७२ कोटी),आलिया भट्ट (६८कोटी) हे पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहेत.यानंतर शाहरुख खान (५६ कोटी), वरूण धवन (४८ कोटी),सलमान खान (४० कोटी),करिना कपूर (३२ कोटी),कतरिना कैफ (३० कोटी) अशी कमाई आहे. या यादीतील दहा कलाकारांची कमाई २०१७ च्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढली आहे.

इ.एस.पी प्रॉपर्टीच्या सांगण्यानुसार, कलाकारांची कमाई २०१७ सालापेक्षा २०१८ मध्ये जास्त वाढली आहे. २०१७ मध्ये ७९५ कोटी रुपये असलेली कमाई २०१८ मध्ये ९९५ कोटी रुपये झाली आहे.

सध्या ब्रॅण्ड्स त्यांची लोकप्रियता व खप वाढवण्यासाठी बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध जोड्यांना पसंती देत आहेत. दीपिका-रणवीर, विराट-अनुष्का अशा जोड्यांना जाहिरातींमध्ये घेण्यासाठी ब्रॅण्ड्स प्रयत्न करत असतात. विकी कौशल, कार्तिक आर्यन,जान्हवी कपूर, सारा अली खान अशा नवोदित कलाकारांनासुद्धा खूप मागणी आहे. इ.एस.पी प्रॉपर्टीचे बिझिनेस हेड विनीत कर्णिक यांनी सांगितले की,”कलाकार व फॅशन यांचा स्थायी संबंध आहे. हा संबंध येत्या काळात कमी होणार नाहीये.कलाकार कायमच तरुणांसाठी फॅशनमधील आदर्श राहणार आहेत.”