Akshay Kumar donates 5 crore for Punjab flood relief : भारतातील काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका पंजाबला बसला असून, पुराच्या पाण्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक सेलिब्रिटींनी बचावकार्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पंजाबमधील अनेक सेलिब्रिटींनंतर आता अक्षय कुमारनेही मदतीसाठी पाच कोटी रुपये दिले आहेत.
अक्षयने स्वतः याबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला, “माझे या संदर्भातील विचार ठाम आहेत. हो, मी पंजाबमधील पूरग्रस्तांना त्यांच्या साधनसामग्रीच्या खरेदीसाठी मदत म्हणून पाच कोटी देत आहे. हे दान नाही. ‘दान’ देणारा मी कोण? जेव्हाही मला मदतीचा हात पुढे करण्याची संधी मिळते, त्यावेळी मी स्वत:ला धन्य समजतो. माझ्यासाठी हीच सेवा आहे. एक छोटं योगदान आहे. पंजाबमधील माझे सर्व बंधू आणि भगिनींवर आलेलं हे संकट लवकरात लवकर टळो हीच प्रार्थना मी करतो. देव दया करो.”
जेव्हा जेव्हा देशात कोणतीही समस्या येते तेव्हा तेव्हा अक्षय नेहमीच मदत करण्यासाठी पुढे येतो, मग तो चेन्नईचा पूर असो किंवा कोविड असो. त्याने ‘भारत के वीर’ अॅपद्वारे सैनिक कुटुंबांनादेखील मदत केली आहे.
या सेलिब्रिटींनीही केली मदत
अक्षयव्यतिरिक्त, दिलजीत दोसांझ, सोनू सूद, रणदीप हुडा, गिप्पी ग्रेवाल, हिमांशी खुराणा, जसबीर जस्सी, करण औजला, गुरू रंधावा व एमी विर्क यांनीही आतापर्यंत मदत केली आहे. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा ‘मेहर’ हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यांनी जाहीर केले की, ते चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे वर्ल्डवाइड कलेक्शन पंजाबमधील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना दान करतील.
अक्षय कुमार केवळ पडद्यावर त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच ओळखला जात नाही, तर वास्तविक जीवनातही त्याचे उदारता आणि सामाजिक सेवेसाठी कौतुक केले जाते.
अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो ‘जॉली एलएलबी ३’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दोन भाग याआधी प्रदर्शित झाले असून, आता ‘जॉली एलएलबी‘चा तिसरा भाग १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.