Akshay Kumar fitness secret : फिटनेस आणि आरोग्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचे नाव नेहमीच घेतले जाते. त्याची दिनचर्या, आहार व जीवनशैली इतकी संतुलित आणि नैसर्गिक आहे की, सर्व वयोगटांतील लोक त्याच्याकडून प्रेरणा घेऊ शकतात.
अलीकडेच, अक्षय कुमारने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत त्याची ‘डिटॉक्स वॉटर’ची बाटली दाखवली आणि तो सामान्य पाणी कसे निरोगी व पौष्टिक बनवतो हे सांगितले.
अक्षय कुमारने सांगितले की, त्याचे डिटॉक्स वॉटर ही महागडी गोष्ट नाही, तर सामान्य घरातील स्वयंपाकघरात मिळणाऱ्या तीन गोष्टींपासून ते बनलेले आहे – काकडी, सफरचंद व पुदिना. तो दिवसभरात सुमारे तीन ते चार लिटर हे पाणी पितो, ज्यामुळे त्याचे शरीर हायड्रेट राहते आणि आतून डिटॉक्सदेखील होते.
अक्षयचे हे डिटॉक्स वॉटर बनवणे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त काही चिरलेली काकडी, सफरचंदाचे काही तुकडे आणि पुदिन्याची काही पाने एका मोठ्या बाटलीत टाकावी लागतील. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही चवीसाठी लिंबाच्या रसाचे काही थेंबदेखील त्यात घालू शकता. त्यानंतर हे पाणी काही तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा; जेणेकरून सर्व घटकांचा स्वाद पाण्यात विरघळेल. तुम्ही हे पाणी दिवसभर आरामात पिऊ शकता. त्यात उष्मांक नाहीत किंवा कोणताही आर्टिफिशियल फ्लेवर नाही, हे पूर्णपणे नैसर्गिक, आरोग्यदायी व ताजेतवाने करणारे पेय आहे.
आता जर आपण त्याच्या फायद्यांबद्दल बोललो, तर काकडी प्रथम येते. काकडी हा एक अतिशय हायड्रेटिंग फूड आहे, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण ९०% पेक्षा जास्त असते. त्याबरोबरच त्यात दाहकविरोधी गुणधर्म आहेत, जे शरीरातील जळजळ कमी करतात आणि पोटाला थंडावा देतात. दुसरीकडे सफरचंद हे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले फळ आहे. ते केवळ पचनास मदत करीत नाही, तर शरीराला ऊर्जादेखील देते. त्याशिवाय सफरचंद शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते. पुदिन्याबद्दल बोलायचे झाले तर, ते केवळ सुगंध व चवीसाठीच नाही, तर त्यात पचनाच्या समस्या दूर करण्याची क्षमता आहे. तो पोटात जळजळ, गॅस व अपचन यांसारख्या समस्या शांत करण्यासाठी काम करतो. तसेच, त्याचा थंड प्रभाव मनाला शांतीदेखील देतो.
अक्षय कुमार दररोज हे पाणी पिण्याची शिफारस करतो. कारण- ते शरीर स्वच्छ ठेवते, तसेच त्वचा चमकदार बनवते, वजन कमी करण्यासही मदत करते आणि ऊर्जेची पातळी उच्च ठेवते. विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा शरीराला जास्त पाणी आणि शीतलतेची आवश्यकता असते, तेव्हा डिटॉक्स वॉटर हा सर्वोत्तम पर्याय आहे.
अक्षय कुमार बॉलीवूडमध्ये खिलाडी म्हणून प्रसिद्ध आहे. मोठमोठे दिग्गजदेखील त्याच्या स्टंट आणि त्याच्या चपळतेचे वेडे आहेत. आज अक्षय कुमार ५७ वर्षांचा झाला आहे; पण त्याला पाहून अजूनही तो २७ वर्षांचा असल्यासारखे वाटते.