अभिनेता अक्षय कुमार त्याच्या स्टंटबाजीसाठी नेहमीच चर्चेत असतो. रिअॅलिटी शो पासून ते अगदी त्याच्या चित्रपटातील थरारक दृश्यांपर्यंत अक्षयने केलेली स्टंटबाजी रसिकांनाही नेहमीच भावते. विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावत अक्षयने आजवर घातलेला धुडगूस म्हणजे एक वेगळ्याच उर्जेचा स्त्रोत. असा हा खिलाडी कुमार सध्या चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या पतंगबाजीमुळे. ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ ट्विट करत अक्षयने आपण पतंगबाजीतही मागे नाही हेच जणू सर्वांना दाखवून दिले आहे. चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे चित्रिकरणात अडथळा आल्यामुळे अक्षयला पतंग उडवण्याचा आनंद घेता आला.
अभिनेता अक्षय कुमारने ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये तो गंगेत एका होडीमधून पतंग उडवताना दिसत आहे. गंगेच्या किनारी पतंग उडवण्याचा मोह बहुधा खिलाडी कुमारलाही आवरला गेला नसावा. तेव्हाच आभाळात भिरकावणारी पतंग पाहून त्याचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. गंगेत पतंग उडवण्याचा आपण विचारही केला नव्हता असे अक्षय या व्हिडिओमध्ये म्हणत आहे. तो उडवत असणारी पतंग ही त्यांची स्वत:ची नाही हेसुद्धा अक्षय कुमार तितक्याच प्रामाणिकतेने सांगत आहे.
सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. न्यायालयीन व्यवस्थेवर चुरचुरीत भाष्य करणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘जॉली एलएलबी’ सिनेमाचा हा सिक्वेल आहे. २०१३ मध्ये ‘जॉली एलएलबी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला होता. ‘जॉली एलएलबी’मध्ये अभिनेता अर्शद वारसी हा मुख्य भूमिकेत होता, मात्र सिक्वेलमध्ये अर्शदऐवजी यावेळी अक्षय कुमारचा समावेश करण्यात आला आहे. नुकताच अक्षय कुमारने त्याचा वाढदिवस साजरा केला. कुटुंबासोबत घालवलेल्या काही निवांत क्षणांचे फोटोही त्याने ट्विट केले होते.
https://twitter.com/akshaykumar/status/775678895240556545
Taking a moment to admire the beauty around…of the holy Ganges, almost tempted to take a dip, what say? pic.twitter.com/8HQnGKnowQ
— Akshay Kumar (@akshaykumar) September 13, 2016