Akshay Kumar Reveals his Diet and Fasting Secrets : अक्षय कुमार त्याच्या कामाव्यतिरिक्त त्याच्या जीवनशैलीसाठी ओळखला जातो. तो बॉलीवूडमधील पार्ट्या टाळणाऱ्या काही कलाकारांपैकी एक आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत, त्याने त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीबद्दल सांगितले.

अक्षय कुमारने एबीपी न्यूजला सांगितले, “मी छोले पुरी खातो. मी अशा लोकांपैकी नाही, जे नेहमी कॅलरीज मोजतात किंवा प्रथिनांच्या सेवनाबद्दल विचार करतात. मी सामान्य जीवन जगतो, कोणी मानो वा न मानो. आजपर्यंत मी जिलेबी आणि बर्फी खातो, मला जे वाटते ते मी खातो.” अक्षय कुमार म्हणाला की, तो नेहमीच एक गोष्ट पाळतो आणि ती म्हणजे संध्याकाळी ६.३० नंतर काहीही न खाणे.

अक्षय कुमार पुढे म्हणाला, “मी संध्याकाळी ६:३० नंतर काहीही खात नाही. जे काही खातो ते सूर्यास्तापूर्वी खातो. मी २० वर्षांचा असल्यापासून हा नियम पाळत आहे. कधी कधी, जेव्हा मित्राचा वाढदिवस किंवा इतर काही प्रसंग असतो, तेव्हा फक्त थोडासा केक खातो.” अक्षय कुमार सध्या ५८ वर्षांचा आहे. याचा अर्थ तो ३८ वर्षांपासून ही सवय पाळत आहे. बॉलीवूड पार्ट्यांमध्ये सहभागी होणे आवडत नसलेल्या अक्षय कुमारनेदेखील स्पष्ट केले की, तो पार्ट्यांमध्ये लोकांना कसे मूर्ख बनवतो.

अक्षय म्हणाला, “कधी कधी मी लोकांना मूर्ख बनवतो. कारण- ते मला ड्रिंक देतात. मी त्यांच्याबरोबर चीअर्स करतो; पण संधी मिळताच ते फेकून देतो. कारण- मला ते पिणे आवडत नाही.” खिलाडी कुमार म्हणून बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अक्षय कुमारला आणखी वेगळ्या ओळखीची गरज नाही. चाहते त्याच्या चित्रपटांची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. अक्षय कुमार हा इंडस्ट्रीतील सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अक्षय हा इंडस्ट्रीतील सर्वांत शिस्तबद्ध कलाकारांपैकी एक मानला जातो.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षयबरोबर अर्शद वारसीदेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सुरुवातीच्या काळात अक्षयने अनेक ॲक्शन चित्रपटांमध्ये काम केले, ज्यामुळे त्याला ‘खिलाडी’ म्हणून ओळख मिळाली. ‘खिलाडी’, ‘मोहरा’ व ‘मैं खिलाडी तू अनाडी’ यांसारख्या चित्रपटांनी त्याला यश मिळवून दिलं.