‘जॉली एलएलबी ३’च्या चर्चेदरम्यान अक्षय कुमारने त्याच्या आणखी एका आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना १८ वर्षांनंतर अक्षय आणि सैफ अली खानची जोडी पाहायला मिळणार आहे. अलीकडेच या अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सैफबरोबर शूटिंग सुरू करताना दिसत आहे.
खरंतर, अक्षय कुमार आणि सैफ अली खान १८ वर्षांनंतर प्रियदर्शनच्या ‘हैवान’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत, ज्याचे शूटिंगही दोघांनी सुरू केले आहे. त्याचवेळी, अक्षय कुमारने अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तो सैफ अली खान आणि प्रियदर्शनबरोबर चर्चा करताना दिसत आहे. अक्षयच्या हातात चित्रपटाचे नाव असलेली एक पाटीदेखील दिसत आहे.
अक्षयने सैफबरोबर ‘हैवान’चे शूटिंग सुरू केले
हा व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करताना अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही सगळे थोडेसे सैतान आहोत… काही बाहेरून सैतान आहेत, तर काही आतून सैतान आहेत.. आज माझा आवडता दिग्दर्शक प्रियदर्शनच्या ‘हैवान’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. जवळजवळ १८ वर्षांनंतर सैफबरोबर काम करण्यास मी खूप उत्साहित आणि आनंदी आहे. चला ‘हैवानियत’ला सुरुवात करूया.” अक्षयची ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘टशन’मध्ये ते एकत्र दिसले होते
अक्षय आणि सैफने ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘ये दिल्लगी’, ‘तू चोर मैं सिपाही’, ‘कीमत’ आणि ‘टशन’सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘टशन’ हा त्यांचा शेवटचा एकत्र चित्रपट होता. इतक्या वर्षांनंतर सैफ आणि अक्षयला एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. व्हिडीओमध्ये सैफ-अक्षयही खूप उत्साही दिसत आहेत. अक्षय लवकरच ‘जॉली एलएलबी ३’मध्ये दिसणार आहे. तसेच अक्षय कुमार ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अर्शद वारसी असेल. यावेळी दोन्ही जॉली म्हणजे अर्शद वारसी आणि अक्षय एकाच चित्रपटात आहेत, तर सौरभ शुक्ला जज आहेत. अक्षय-अर्शदची जुगलबंदी यामध्ये बघायला मिळणार आहे.