देश सध्या करोना व्हायरसच्या विक्राळ रूपाचा सामना करतोय. वेगवेगळ्या राज्यात आणि शहरातील रूग्णालयातील बेड्स, ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्यामुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. अशा परिस्थीत बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना करोना पिडीतांच्या मदतीला धावून आलेत.

ट्विंकल खन्नाने आपल्या ट्विटर हॅंडलवरून ट्विट करत एक आनंदाची बातमी दिलीये. देशात ऑक्सिजनची कमतरता पाहता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने थेट लंडनहून १२० सिलेंडर मागवले असून ते करोना पिडीतांना दान करणार आहेत. ट्विटमध्ये लिहीताना ट्विंकल म्हणाली, ” आनंदाची बातमी… दैविक फाऊंडेशनच्या माध्यमातून लंडन एलाईट हेल्थचे डॉक्टर द्रशनिका पटेल आणि डॉक्टर गोविंद बानकानी यांनी 120 ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर्स देण्याची घोषणा केलीय…सोबत अक्षय कुमार आणि मी दोघांनी आणखी १२० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स मिळवले आहेत, तर एकूण आम्ही २२० ऑक्सिजन सिलेंडर्स मिळवले आहेत, आम्हाला जितकं शक्य आहे तितकी आम्ही मदत करतोय, करत राहणार…”.हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स थेट लंडनहून येणार असल्याचंही या ट्विटमध्ये ट्विंकलने सांगितलं.

हे कॉन्सनट्रेटर्स करोना पिडीतांना दान करण्यासाठी ट्विंकल विश्वासू संस्थांचा शोध घेत आहे. यासाठी तिने ट्विटमध्ये विश्वासू सामाजिक संस्थांची माहिती असल्यास कळवण्याचं आवाहन देखील केलंय.

अक्षय कुमारने दान केले एक करोड रूपये
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला उभा राहीलाय. गेल्याच वर्षी त्याने २५ करोड रूपयांचे दान करत मदत केली होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेतही त्याने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केलाय. करोना पिडीतांसाठी ऑक्सिजन, औषध आणि जेवण उपलब्ध करून देण्यासाठी अक्षयने गौतम गंभीर फाऊंडेशनला १ करोड रूपयांची मदत केलीय. ट्विटर ट्विट करत गौतम गंभीरने बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे आभार देखील मानले आहेत.