जगभरात पाय पसरलेल्या करोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार खबरदारीच्या सूचनाही करण्यात येत आहे. यात कलाकार मंडळीही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला काळजी घेण्याचं आवाहन करत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह कलाविश्वातील ११ सेलिब्रिटींनी फॅमिली या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून जनजागृती केली. विशेष म्हणजे या सगळ्या कलाकारांनी आपआपल्या घरी राहून या शॉर्टफिल्ममध्ये काम केलं. त्यामुळे चाहत्यांना एक प्रश्न पडला होता. तो म्हणजे या शॉर्टफिल्मसाठी कलाकारांचे व्हिडीओग्राफर कोण झाले असतील. त्यामुळे  ही शॉर्ट फिल्म करणाऱ्या प्रसून पांडे यांनी या व्हिडीओग्राफरची नावं सांगितली आहेत.

प्रसून पांडे यांच्या कल्पनेमधून साकार झालेल्या या शॉर्टफिल्मध्ये अमिताभ बच्चनपासून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला होता. विशेषमध्ये या फिल्मसाठी ही कलाकार मंडळी एकमेकांना भेटली नसून त्यांनी त्यांच्याच घरी राहून या फिल्ममध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र ही फिल्म पाहिल्यानंतर या कलाकारांनी एकमेकांपासून दूर राहून हे चित्रीकरण केलंय यावर विश्वास बसणार नाही. तर घरी राहून या कलाकारांचं चित्रीकरण कोणत्याही दिग्गज फोटोग्राफर किंवा व्हिडीओग्राफरने केलं नसून त्यांच्याय घरातल्या सदस्यांनी केलं आहे.

लॉकडाउन असल्यामुळे सध्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्रचं राहत आहेत.त्यामुळे या दोघांनीही एकमेकांचं चित्रीकरण केलं. तर  अभिनेत्री प्रियांका चोप्रासाठी तिचा गायक नवरा निक जोनास व्हिडीओग्राफर झाला. प्रियांकाचा व्हिडीओ त्याने शूट केला.


बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ अभिषेक बच्चन शूट केला. तर रजनीकांत यांचा व्हिडीओ त्यांची लेक सौंदर्या हिने शूट केला आहे. विशेष म्हणजे या फिल्मसाठी कसे व्हिडीओ हवे आहेत, हे सांगण्यासाठी प्रसून यांनी कलाकारांना एक व्हिडीओ पाठवला होता. त्यानुसार कलाकारांनी त्यांच्या फ्रेम वैगरे निवडल्या. तसंच २ एप्रिलपर्यंत त्यांनी सगळ्या कलाकारांनी शॉर्टफिल्मची संकल्पना नीट समजावून सांगितली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सगळ्या कलाकारांनी त्यांचे व्हिडीओ प्रसून यांना पाठविले.

दरम्यान, या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून जनतेला लॉकडाउनचं महत्त्व पटवून देण्यात आलं आहे. तसंच घरात राहणं किती गरजेचं आहे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी जनजागृती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या शॉर्टफिल्ममधून होणाऱ्या कमाईतून गरजूंना शिधा पुरविण्यात येणार आहे. या शॉर्टफिल्ममध्ये चिरंजीवी,अमिताभ बच्चन, रजनीकांत, रणबीर कपूर, मोहनलाल मामुटी, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, सोनाली कुलकर्णी आणि दिलजीत दोसांज ही कलाकार मंडळी झळकली आहेत.