महिना आठ हजार कमवणाऱ्या पुणेकर डिलिव्हरी बॉयसाठी अमिताभ स्वत: झाले डिलिव्हरी बॉय, दिली खास भेट

यावेळी ही खास भेट स्वीकारणाऱ्या आकाशबरोबरच अमिताभ बच्चन सुद्धा भावूक झाल्याचं पहायला मिळालं, अमिताभ आकाशचा संघर्ष पाहून भारावून गेले होते.

KBC 13 contestant Akash Waghmare
बुधवारच्या केबीसीमधील भावूक प्रसंग (फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही रिअ‍ॅलिटीशोच्या १३ व्या पर्वामध्ये बुधवारी एक फारच खास गोष्ट घडली. तसं होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून केबीसी खेळणं हेच अनेकांसाठी स्वप्न पूर्ण झाल्याप्रमाणे असतं. पण आपल्या सहज आणि मृदू स्वभावाने अमिताभ अनेक स्पर्धकांना अगदी काही क्षणात आपलसं करुन घेतात. असंच काहीसं बुधवारी पुण्यातील एका स्पर्धासोबत घडलं. चुकीचं उत्तर दिल्याने त्याला थेट ९ लाख ३० हजारांचा फटका बसला मात्र तो आयुष्यभरासाठी स्मरणात राहील अशी एक आठवण स्वत: सोबत घेऊन गेला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत बुधवारी हॉट सीटवर बसलेल्या पुण्याच्या आकाश वाघमारेला २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. आकाश हा रोल ओव्हर स्पर्धक होता. आकाशने मंगळवारी १० हजार रुपये जिंकले होते. पुण्यामध्ये एक बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या आकाशने आज तीन लाख १० हजार रुपये अधिक जिंकत तीन लाख २० हजार जिंकले. महिन्याला ८ हजार रुपये कमवणाऱ्या २७ वर्षीय आकाशसाठी ही रक्कम फार असली तरी एका चुकीच्या उत्तरामुळे त्याला ९ लाख ३० हजारांचा फटका बसला आणि तो १२ लाख ५० हजारांवरुन ३ लाख २० हजारांवर आला. आकाशला फार मोठी रक्कम जिंकता आली नसली तरी अमिताभ यांनी बुधवारी प्रश्न उत्तरांचा खेळ सुरु करण्याआधी पुण्याच्या या डिलिव्हरी बॉयला एक खास गोष्ट भेट दिली. यामुळे आकाशबरोबरच त्याच्या पालकांचे डोळेही पाणावले आणि विशेष म्हणजे हे गिफ्ट देणारे बॉलिवूडचे बीग बी अमिताभही थोडे भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> KBC 13: पुण्यातील आकाश वाघमारेला एक चूक पडली ९ लाख ३० हजारांना; तुम्हाला ‘या’ प्रश्नाचं उत्तर महितीय का?

एमएम पर्यंत शिक्षण घेतलेला आकाश हा सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. आकाशला त्याच्या वडीलांवर उपचार करायचे असून नवीन घरंही घ्यायचं आहे असं त्याने कार्यक्रमात सांगितलं. आकाशने मजल दर मजल करत १२ लाख ५० हजारांपर्यंत मजल मारली. मात्र १२ लाख ५० हजारांनंतर २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देताना तो चुकला आणि थेट ३ लाख २० हजारांवर आला. आकाशने या कार्यक्रमामध्ये आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली. आकाश हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून तो सध्या पार्ट टाइम डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम करतो. पुण्यामध्ये तो दिवसातील सहा तास डिलिव्हरी बॉयचं काम करुन आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतोय. महिन्याला आकाशला आठ हजार रुपये मिळतात. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्यासाठी आकाशने पैसे वाचवून एक बाईक घेतली. या बाईकसाठी डाऊन पेमेंट म्हणून भरलेले २५ हजार ही आपण आतापर्यंत पाहिलेली सर्वात मोठी रक्कम होती असं आकाशने अमिताभ यांना सांगितलं. आकाशने ३ लाख २० हजार जिंकल्यानंतर  अमिताभ यांनी अगदी आनंदाने आकाशला ३ लाख २० हजारांचा चेक देत ही तुमच्या साडेतीन वर्षांच्या कमाई इतकं आहे असंही म्हटलं. आकाश म्हणजे जिद्द आणि चिकाटीचं उत्तम उदाहरण असल्याचं अमिताभ यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> KBC 13: सात कोटींसाठी विचारण्यात आला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातील ‘हा’ प्रश्न; देता आलं नाही उत्तर

मात्र बुधवारचा शो सुरु होण्याआधी डिलिव्हरी बॉय असणाऱ्या आकाशला अमिताभ यांनी एक खास भेट दिली. कार्यक्रमाला सुरुवात होताना आकाशने आपण परिधान केलेला तपकिरी रंगाचा सदरा हा आईच्या आवडीचा असल्याचं अमिताभ यांना सांगितलं. अमिताभ यांनी छान आहे सदरा असं म्हणत प्रेक्षकांना आकाश हा डिलिव्हरी बॉय असल्याची आठवण करुन दिली. त्यानंतर पुढे बोलताना अमिताभ यांनी, “किती विरोधाभास आहे पाहा की अनेकांना त्यांच्या आवडीचे पदार्थ घरपोच देणाऱ्या आकाशला स्वत:ला मात्र त्याच्या आवडीचा पदार्थ मागवता येत नाही. त्याचं स्वप्न आहे की कधीतरी त्याने ऑर्डर केलेला त्याचा आवडीचा पदार्थ म्हणजेच बिर्याणी घेऊन एखाद्या डिलिव्हरी बॉयने यावं. आज आम्ही त्यांची ती इच्छा पूर्ण करणार आहोत,” असं म्हटलं. त्यानंतर अमिताभ यांनी एक पार्सल आकाशच्या हातात टेकवत, “मीच तुमचा तो डिलिव्हरी बॉय असून ही घ्या बिर्याणी,” असं म्हणत आकाशला सप्राइज दिलं. अमिताभ सारख्या बड्या कलाकाराने दिलेली ही अनोखी भेट पाहून आकाश आणि त्याचे आई इंदुबाई वाघमारे आणि वडील रावसाहेब वाघमारे भारावून गेले. आमचा मुलगा तुमच्यासमोर आला यातच आम्ही करोडपती झालो अशा शब्दांमध्ये इंदुबाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नक्की वाचा >> KBC 13: रेल्वेमंत्र्यांसंदर्भातील प्रश्नामुळे गमावले ९ लाख ३० हजार; तुम्हाला ‘या’ प्रश्नाचं उत्तर ठाऊक आहे का?

आकाशवर सध्या सर्वच स्तरामधून कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकताच पुण्यात त्याचा एक छोटेखानी सत्कार करण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchan turns delivery person for kbc 13 contestant akash waghmare watch video scsg

ताज्या बातम्या