टीआरपी कमी झाल्यामुळे अगदी नवीन मालिकांनाही अल्पावधीतच निरोप देण्याचा प्रकार सध्या मराठी मनोरंजन वाहिन्यांवर सुरू आहे. विशेषत: करोनानंतर अनेक नवीन मालिका टीआरपीअभावी बंद करण्यात आल्या. त्याजागी लगोलग नवीन मालिका दाखल केल्या जातात. नुकताच याचा फटका झी मराठी वाहिनीवरील ‘लोकमान्य’ या ऐतिहासिक मालिकेला बसला. उत्तम निर्मितीमूल्ये, कलाकार असलेली ही मालिका टीआरपीअभावी वेळेआधीच बंद करण्यात येत आहे. आता याच कारणास्तव झी मराठीवरील ‘३६ गुणी जोडी’ ही नवीन मालिकाही बंद होणार असून त्याजागी ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवीन मालिका दाखल होणार आहे.

मराठी वाहिन्यांवर आजपर्यंत वेगळय़ा धाटणीच्या आणि वेगवेगळय़ा विषयांच्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत. या मालिकांना प्रेक्षकांचा कमीअधिक प्रमाणात प्रतिसाद मिळतोच, मात्र सध्या हिंदी वाहिन्या, मराठीतही मनोरंजन वाहिन्यांची वाढती संख्या, ओटीटी यामुळे मालिकांच्या टीआरपीचे गणित कोलमडले आहे. मालिकेचा टीआरपी जेवढा जास्त तेवढा दीर्घकाळ मालिका चालवण्यात येते. अन्यथा त्या मालिकेमुळे इतर मालिकांनाही फटका बसतो असे कारण देत कमी टीआरपी असलेल्या मालिका बंद करून त्याजागी नवीन मालिका आणली जाते. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली असली तरी कमी टीआरपी असल्याने निर्मात्यांना मालिका बंद करावी लागते.  सध्या झी मराठीवर सुरू असलेली ‘लोकमान्य’ ही मालिका लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक नाराज आहेत. आता याच वाहिनीवरील ‘३६ गुणी जोडी’ ही मालिकाही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 २३ जानेवारी रोजी सुरू झालेल्या ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेचे कथानक बरेचसे पुढे सरकले आहे. नायक-नायिकेचे लवकरात लवकर लग्न जुळावे म्हणून कथानकाने वेग घेतला आहे. खरंतर ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिकी टीआरपी नसल्याने बंद होणार अशी चर्चा होती. मात्र त्या मालिकेतील कथानकात केलेल्या बदलांमुळे आता मालिकेने चांगलीच पकड घेतली आहे. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेची वेळ बदलून ती ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेच्या वेळेत संध्याकाळी ६.३० वाजता दाखवण्यात येणार आहे. ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेऐवजी दोन बहिणींची कथा सांगणारी ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवी मालिका २१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अशोक शिंदे, खुशबू तावडे आणि शर्मिष्ठा राऊत असे दूरचित्रवाहिनीवर गाजलेले कलाकार या नव्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.