बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारत स्वतःला अभिनयातून सिद्ध केलंय. त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्याचे लाखो चाहते आहेत. नवाजुद्दीनने चाकोरीबाहेरच्या अनेक भूमिका केल्यात. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूकमुळे चर्चेत आहे. त्याच्या आगामी ‘हड्डी’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये नवाज स्त्रीपात्रात दिसत आहे. या पोस्टरमधील त्याचा बदललेला लूक पाहून त्याला ओळखणे खूप कठीण आहे.

“ही तर अर्चना पुरण सिंग!” नव्या लूकमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी ट्रोल

या पोस्टरनंतर नेटकऱ्यांनी हा नवाजुद्दीन नसून अभिनेत्री अर्चना पूरण सिंग असल्याचं म्हटलंय. पोस्टर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर नेटकरी मोठ्या प्रमाणात अर्चना पूरण सिंग यांना ट्रोल करत आहेत. पण अभिनेत्रीने सोशल मीडियावर नवाजुद्दीन सिद्दीकीशी होणारी तुलना मनापासून स्वीकारली आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली. “माझ्या हेअरस्टाइलमुळे लोकांशी माझी तुलना केली जाते. कपिल शर्मा शोच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी असा साइड-पार्टेड लुक केला होता. पण आता नवाजसारख्या अभिनेत्याशी माझी तुलना होत असेल तर ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे,” असं अर्चना म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नवाजचा ‘हड्डी’ हा चित्रपट रिव्हेंज ड्रामा आहे. तो 2023 साली प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन अक्षत अजय शर्माने केलंय. तर आनंदिता स्टुडिओ आणि झी स्टुडिओजच्या प्रोडक्शन बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.