शशी व्यास
४ नोव्हेंबर हा विजया मेहता या ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मीचा ८६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या शिष्यगणांनी त्यांच्या आजवरच्या रंगमंचीय कार्याचे दस्तावेजीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. हे औचित्य साधणारा लेख..
विजयाबाई हे एक अजब रसायन आहे. बाईंनी आपल्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनामध्ये एक अदृश्य लक्ष्मणरेखा आखून ठेवली आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण बाबींचा सुरेख समन्वय त्यांनी साधला आहे. बाईंच्या नाटय़प्रवासाचा आलेख कॉलेजजीवनापासूनच एक नाटय़प्रेमी म्हणून मला माहीत होता. ‘हमिदाबाईची कोठी’ आणि ‘बॅरिस्टर’ या दोन नाटकांनी तर आम्हाला संमोहित केले होते; पण ते एक रसिक प्रेक्षक या भूमिकेतून! बाईंच्या अफाट कर्तृत्वाची जाणीव त्यातून झाली होती. पण त्यांची खरी ओळख झाली ती त्यांच्या सहवासात आल्यानंतरच. त्यांच्या यशोकीर्तीमागे त्यांची असलेली डोळस मेहनत, प्रज्ञावंत वैचारिक बैठक, करडी, पण प्रेमयुक्त शिस्त आणि त्यांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. बाईंच्या या सगळ्या गुणांचा साक्षात्कार त्यांच्या कार्यशाळेच्या वेळेस प्रकर्षांने झाला.
विजयाबाईंनी एक तरी नाटय़कार्यशाळा आजच्या तरुण पिढीसाठी घ्यावी असे मनापासून वाटत होते आणि त्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. बाईंनी आपल्या नाटय़शास्त्रातील ज्ञानाची अनुभवसंपन्न संपत्ती या कार्यशाळेद्वारे आजच्या नाटय़कर्मीना भरभरून द्यावी असे सतत वाटत होते. परंतु कार्यशाळेचा विषय काढताच ‘आता नको, नंतर बघू,’ असं सांगून बाई तो सतत टाळत असत. मी कार्यशाळेच्या बाबतीत फारच पाठपुरावा केला तेव्हा त्यांनी आपली कार्यशाळेच्या उद्देश-सफलतेविषयीची साशंकता बोलून दाखविली. आजच्या पिढीशी त्या आवश्यक संवाद साधू शकतील की नाही, याबद्दल त्यांची द्विधा मन:स्थिती होती. त्यावेळी त्यांची पट्टशिष्या नीना कुळकर्णीची मोलाची मदत झाली. नीनाने आजची पिढी बाईंचे मार्गदर्शन घेण्यासाठी किती आतुर आहे हे आपल्या खास पद्धतीने त्यांना पटवून दिले. तरीही बाईंनी कार्यशाळा घेण्याची संमती देण्याआधी जवळपास चार-सहा महिने घेतले. मग एक दिवस मी जाहिरातीचे आर्ट वर्क त्यांना दाखवून सांगितले की, ‘तुमची कार्यशाळा अमुक अमुक तारखेपासून सुरू होणार आहे. आणि ही त्याची जाहिरात.’ वर बाईंना सांगितले की, ‘तुम्ही नाही म्हणालात तर त्याचे परिणाम भोगायला मी तयार आहे. तुमचा हा मानसपुत्र तुम्हाला कार्यशाळा घेण्याचे आर्जव करतो आहे, तेव्हा नाही म्हणू नका.’ यावर बाई खूपच गंभीर झाल्या. पण त्यांना आमचा विचार पक्का आहे हे त्यातून कळले आणि त्यांनी कार्यशाळा घेण्यासाठी संमती दिली. अलबत्ता त्यांनी ठरवलेल्या तारखेस आणि एनसीपीएच्या प्रायोगिक रंगभूमी सभागृहातच! दोन दिवसांच्या या कार्यशाळेला सिने-नाटय़सृष्टीतील तरुण पिढीचा आणि प्रौढ, अनुभवी पिढीचाही उदंड प्रतिसाद मिळाला. २७५ प्रवेशांसाठी जवळपास ३००० अर्ज आले. आमच्याबरोबरच बाईसुद्धा या सुखद अनुभवाने भारावून गेल्या. या कार्यशाळेसाठी मुख्यत्वे नीना कुळकर्णी आणि त्याचबरोबर विक्रम गोखले, प्रतिमा कुलकर्णी अशा बाईंच्या अनेक मान्यवर शिष्यांचीही खूप मदत झाली. या कार्यशाळेत नाना पाटेकर, विक्रम गोखले, सचिन खेडेकर, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, अतुल परचुरे, आयेशा जुल्का, ऐश्वर्या व अविनाश नारकर, जयंत कृपलानी अशा अनेक ज्येष्ठ कलाकारांपासून ते प्रिया बापट, उमेश कामत, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, ऋजुता देशमुखसारखे त्या काळातील उदयोन्मुख कलाकार उत्साहाने सहभागी झाले होते. प्रतिमा कुलकर्णी आणि अर्चना देशमुख बाईंच्या मदतीला होत्याच. नाना मला म्हणाला की, ‘तुझा संगीताशी संबंध आहे, पण नाटकाचे क्षेत्र तुझे नाही. तरीही बाईंनी तुला कार्यशाळा घेण्यासाठी होकार कसा दिला?’ मी फक्त त्यावेळी हसलो. प्रास्ताविक निवेदनात मी म्हटले की, ‘बाईंच्या अंतर्मनात सदैव वसलेल्या आईला विनंती केल्यावर होकार मिळेलच याची मला खात्री होती.’ बाईंनी हा धागा पकडून जवळपास तासभर उपस्थित रंगकर्मीशी जो संवाद साधला तो केवळ अविस्मरणीय असाच होता. इतके मुद्देसूद, विषयाशी सुसंगत, तर्कशुद्ध आणि ऐकणाऱ्याच्या मनाला व बुद्धीला एकाच वेळी प्रभावित करणारे असे बाईंचे विवेचन होते. नाटय़सृष्टीतील आपल्या प्रवासाबरोबरच नाटय़-कार्यशाळेचे महत्त्व ज्या अभ्यासपूर्ण, रसवंतीपूर्ण, ओघवत्या शैलीत सहज, सोप्या व समर्पक शब्दांद्वारे त्यांनी उलगडले, ते क्षण माझ्यासाठी अद्भुत, अवर्णनीय आनंद देणारे होते. एका अनन्यसाधारण अनुभूतीचा प्रसाद मिळाल्याचा निखळ आनंद त्यात होता.
या कार्यशाळेनंतर बाईंच्या आणखी दोन कार्यशाळांचे ‘पंचम निषाद’तर्फे आयोजन करण्यात आले आणि प्रत्येक वेळी वेगळ्या अनुभवांचा प्रत्यय आला. त्या कार्यशाळांतून नकळतपणे बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो. रवींद्र नाटय़ मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये झालेल्या बाईंच्या कार्यशाळेमध्ये व्यावसायिक नाटके करणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी मुलीने बाईंना विनंती केली की, बाईंनी तिचा एक तरी छोटासा कलाविष्कार बघून आपणास मार्गदर्शन करावे. बाईंनी त्यांच्या नियोजित वेळापत्रकात तिचे मन राखण्यासाठी थोडा बदल करून तिला तशी संधी दिली. त्या मुलीने एका अत्यंत यशस्वी, पण काळ्या रंगाच्या मुलीची लग्न होत नसल्याची खंत व चीड कारणासहित आपल्या सादरीकरणातून पेश केली. नंतर बाईंनी या सादरीकरणाचे विश्लेषण करताना जे मुद्दे मांडले ते थक्क करणारे होते. ते ऐकताना त्या मुलीच्या डोळ्यांनी अश्रूंना मुक्त वाट करून दिली. ती एवढेच म्हणाली की, ‘‘ बाई, आम्हाला आजतागायत कोणीही असे मार्गदर्शन केलेले नाही. आज तुम्ही आम्हाला एखादी व्यक्तिरेखा साकारताना काय आणि कसा विचार केला पाहिजे याचा एक वस्तुपाठच घालून दिला. आम्ही तुमचे खूप ऋणी आहोत.’’
बाई.. ४ नोव्हेंबरला तुमचा ८६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने तुम्हाला उत्तम आयुरारोग्य, उदंड आयुष्य, अमर्याद प्रेम आणि चिरंतन आनंद लाभो, हीच अंत:करणपूर्वक सदिच्छा.
यंदा विजयाबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांचे शिष्य आणि सहकलाकार एक उपक्रम हाती घेत आहोत. राजहंस प्रकाशनने काही वर्षांपूर्वी ‘बाई’ हे पुस्तक वाचकांसाठी प्रकाशित केलं होतं. विजयाबाईंबद्दल त्यांच्या सुहृदांना काय वाटतं हे त्यात प्रत्येकाने लिहिलं होतं. ह्याच पुस्तकाचं ‘ऑडियो बुक’ आता ‘स्टोरीटेल’तर्फे सादर होणार आहे. पुस्तकातील आपापले लेख अभिवाचनाच्या स्वरूपात सादर करणार आहेत नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, विजय केंकरे, अंबरीश मिश्र, महेश एलकुंचवार, प्रतिमा कुलकर्णी, भारती आचरेकर, अमृता सुभाष, मंगेश कुळकर्णी, मीना नाईक, प्रदीप वेलणकर, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, वंदना गुप्ते, अजित भुरे आणि अन्य कलाकार. विजया मेहता ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख ह्या ऑडियो बुकच्या निमित्ताने रसिकांना ऐकायला मिळेल हे नक्की.
– अजित भुरे .