मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. यामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अनेक रात्री तुरुंगात काढाव्या लागत आहे. दरम्यान आर्यन खानच्या जामिनावर आज (२८ ऑक्टोबर) दुपारी सुनावणी केली जाणार आहे. मात्र जर आज (२८ ऑक्टोबर) आणि उद्या (२९ ऑक्टोबर) ही सुनावणी आर्यनच्या जामिनावर योग्य निर्णय झाला नाही, तर मात्र त्याला दीर्घकाळ तुरुंगात राहावं लागणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर आज (२८ ऑक्टोबर) होणारी सुनावणी पुढे ढकलली गेली तर पुढील १५ दिवस त्यांना तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता आहे.

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी कोर्टाकडून वारंवार तारखा दिल्या जात आहे. त्यामुळे आर्यन खानसह इतर आरोपींना कालची रात्रही तुरुंगातच काढावी लागली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अरबाज मर्चंटसाठी ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. ज्येष्ठ वकील आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. मात्र, या युक्तीवादाला अधिक वेळ लागल्यानं न्यायालयानं जामिनावर उद्या पुन्हा सुनावणीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे याप्रकरणी आज दुपारी दीड वाजता सुनावणी होणार आहे.

‘आर्यनसह दोघांच्या अधिकारांचे एनसीबीकडून उल्लंघन’ ; वकिलांचा दावा

मात्र जर येत्या दोन दिवसात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही तर मात्र पुढील १५ दिवस आर्यनला तुरुंगातच राहावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण येत्या ३० आणि ३१ ऑक्टोबरला म्हणजेच शनिवार-रविवारी सुट्टी असल्यामुळे हायकोर्ट बंद राहिल.

यानंतर मुंबई हायकोर्टाच्या दिवाळी सुट्टीला सुरुवात होती. ही सुट्टी १ नोव्हेंबरपासून सुरु होईल. त्यामुळे १ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत हायकोर्टाला दिवाळीची सुट्टी असेल. त्यानंतर १३ आणि १४ नोव्हेंबरला शनिवार-रविवार असल्याने पुन्हा कोर्ट बंद राहिल. त्यामुळे दिवाळीच्या सुट्यांपूर्वी २९ ऑक्टोबर हा मुंबई उच्च न्यायालयाचा कामकाजाचा शेवटचा दिवस असेल. यामुळे आर्यन खानची दिवाळीही तुरुंगातच जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आतापर्यंत नेमकं काय झालं?

२ ऑक्टोबरला एनसीबीनं मुंबईत कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान, एनसीबीनं एकूण ८ लोकांना अटक केली. अटकेची कारवाई झाल्यापासून हे सर्वजण तुरुंगातच असून त्यांच्या जामीन याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू असताना मंगळवारी (२६ ऑक्टोबर) दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच आरोपींना जामीन मिळाला.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. त्यांच्या अर्जांवर काल (२७ ऑक्टोबर) सुनावणी झाली. दुसरीकडे एनडीपीएस न्यायालयात देखील या प्रकरणातील इतर आरोपींच्या जामीन अर्जांवर सुनावणी सुरू आहे. याच सुनावणीमध्ये दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

विशेष एनडीपीएस न्यायालयाकडून कुणाला जामीन मंजूर?

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मनीश राजगरिया आणि आविन साहू या दोघा आरोपींना विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मिळालेले ते पहिलेच आरोपी आहेत. यातील एक सहआरोपी मनिष राजगरियाचे वकील अजय दुबे यांनी पत्रकारांना याची माहिती दिली आहे. मुंबई शहरातील विशेष एनडीपीएस न्यायायाने मनीष राजगरियाला जामीन मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.