एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ या सिनेमाची ओळख ही रेकॉर्ड ब्रेक सिनेमा अशीच बनली आहे. आता बाहुबलीची जादू संपली असं मानणाऱ्यांना हा सिनेमा दर दिवशी काही नवीन सांगून जातो. या सिनेमाने एकूण ९२५ कोटींची कमाई केली आहे. यापैकी भारतात ‘बाहुबली २’ने ७४५ कोटींची कमाई केली तर परदेशात १८० कोटी रुपये कमवले आहेत. व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी यासंदर्भात ट्विट करून अधिकृत माहिती दिली.

याआधी आमिरच्या ‘पीके’ सिनेमाने जगभरात एकूण ७६८ कोटींची कमाई केली तर ‘दंगल’ने ७१६ कोटींचा गल्ला जमवला होता.  ‘बाहुबली २’ने ‘दंगल’ आणि ‘सुलतान’ या सिनेमांना मागे टाकून सर्वाधिक २४७ कोटी रुपयांची कमाई केली आहे, असे ट्विट करत त्यांनी राजामौली यांचे अभिनंदनही केले होते. व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विट करत पहिल्या आठवड्यातील दंगल, सुलतान आणि बाहुबली २ची कमाई सांगितली. ‘दंगल’ने सात दिवसात १९७.५४ कोटी, ‘सुलतान’ने नऊ दिवसात २२९.१६ कोटी आणि ‘बाहुबली’ने २४७ कोटी रुपयांची कमाई केली.

‘बाहुबली’ सिनेमाची क्रेझ पाहता हा सिनेमा पुढच्या आठवड्यातही चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारण पुढच्या आठवड्यात ‘बाहुबली’ला तोडीस तोड स्पर्धा देण्यासाठी एकही सिनेमा प्रदर्शित होत नाहीये. त्यामुळे पुढचा आठवडाही बाहुबलीचाच असेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.