“पुन्हा तुमच्याबरोबर असा गलिच्छ प्रकार होऊ देणार नाही”; मनसेने मराठी महिलांना दिला शब्द

गुरुवारी घोडबंदरमधील एका फार्म हाऊसवर या कास्टींग डायरेक्टर्सला रंगेहाथ पकडण्यात आल्याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

Ameya Khopkar
अमेय खोपकर यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हा संदेश दिलाय.

मुलींना चित्रपटामध्ये रोल देतो असं सांगून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या चार परप्रांतीय कास्टींग डायरेक्टर्सला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ठाण्यातील घोडबंदर येथे चांगलाच चोप दिल्याचं पहायला. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दिली. उत्तर प्रदेशमधील या तरुणांनी मराठी अभिनेत्रीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचं मनसेने म्हटलं आहे. या चौघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून यासंदर्भात अमेय खोपकर यांनी फेसबुकवरुन एक आवाहनही केलं आहे.

“चित्रपटसृष्टीत सध्या परप्रांतीय गुंडांचा सुळसुळाट झालेला आहे. आपल्याच राज्यातल्या नेत्यांचा राजकीय वरदहस्त असलेल्या या गुंडांकडून माझ्या महाराष्ट्रातल्या माय-भगिनींना ‘कास्टींग काऊच’चा सामनाही करावा लागतोय. हे अतिशय दुर्दैवी आहे,” असं अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी, “राज ठाकरेंच्या तालमीत तयार झालेले आम्ही महाराष्ट्र सैनिक अशा गुंडांची गय करणार नाही. मनोरंजन क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याच्या उद्देशाने संघर्ष करत असलेल्या माय-भगिनींना आमचा शब्द आहे की पुन्हा तुमच्याबरोबर असा गलिच्छ प्रकार होऊ देणार नाही. या परप्रांतियांना आज तर आम्ही चांगलाच चोप दिलाय आणि पोलिसांच्या स्वाधीनही केलंय, पण असेच बरेच लिंगपिसाट मोकाट फिरतायत, त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. त्वरित महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेशी संपर्क साधा. तुमचं संरक्षण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक सदैव तत्पर आहोत,” असं म्हटलंय.

अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन गुरुवारी घोडबंदरमधील एका फार्म हाऊसवर या कास्टींग डायरेक्टर्सला रंगेहाथ पकडण्यात आल्याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये खोपकर यांनी संपूर्ण प्रकार काय आहे याची माहिती दिली. एका मराठी अभिनेत्रीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना फोन करुन यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली होती. या अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार तिला चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका देण्यात आल्याचं सांगितलं. मात्र हा रोल हवा असेल तर उद्या या चित्रपटाचे निर्माते उत्तर प्रदेश लखनऊमधून मुंबईत येणार आहेत. तर तुला त्यांना खूष करावं लागेल, तुला कॉम्प्रमाइज करावं लागेल. असं केलं तरच तुला त्या मोठ्या चित्रपटात रोल दिला जाईल असं या अभिनेत्रीला सांगण्यात आल्याचं खोपकर म्हणाले. या अभिनेत्रीने घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना कळवल्यानंतर या लोकांना ट्रॅप करुन ताबडतोब पोलिसांच्या हवाली करण्यास सांगितलं. घोडबंदर रोड येथील एका फार्म हाऊसवर ही मुलगी गेली तेव्हा मनसेचे पदाधिकारीही तेथे पोहचले. मनसे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी या चौघांना चांगलाच चोप दिला. या चौघांकडे कट्टेपण सापडलेत. गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव अशी या चौघांची नाव असल्याचं खोपकर यांनी सांगितलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांनी यासंदर्भातील माहिती एका व्हिडीओच्या माध्यमातून दिलीय. एका मराठी मुलीला तिवारी आणि यादव नावाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटांमध्ये काम देतो असं सांगून फसवलं. या दोघांसाठी कास्टींगचं काम करणाऱ्या दोन व्यक्तींनी या मुलीला तुला निर्मांना खूष करावं लागेल असं सांगितलं. त्यानंतर या मुलीला फोन करुन सांगण्यात आलं की तुला ठाण्यातील एका हॉटेलमध्ये यायचं आहे जिथे आम्हा दोघांबरोबरच आमचा एक मित्रही असेल. आमचा मित्र लखनऊवरुन येणार असून तुला रात्रभर त्या हॉटेलमध्ये आम्हा तिघांसोबत थांबावं लागेल असं या मुलीला सांगण्यात आलं. यासंदर्भात अमेय खोपकर यांना माहिती दिली असता त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना या लोकांना तुडवण्यास सांगितल्याची माहिती राणे यांनी. ही अशी माणसं उत्तर प्रदेश, बिहारमधून येतात आणि आपल्या मुलींना खराब करण्यासाठी त्यांना नको नको त्या चित्रपटांमध्ये काम देण्याचं आमिष दाखवलं जातं. मात्र या मुलीची दाद दिली पाहिजे कारण तिने यांच्याविरोधात उभं राहण्याचा निर्णय घेतला. हे असे नराधम लोकांसमोर आले पाहिजेत. आज मी आवाज नाही उठवला तर हे लोक अशा किती महिलांवर आत्याचार करतील सांगता येत नाही. तिच्या या एका आवाजासाठी आम्ही इथे एकत्र येऊन या लोकांना चोप दिल्याची माहिती राणे यांनी दिलीय.

सध्या पोलिसांनी या चौघांनाही ताब्यात घेतलं असून यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेने केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Be aware of casting couch and contact us in case you need any help say mns leader ameya khopkar scsg

ताज्या बातम्या