‘विक्रम वेधा’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आणि त्याला अडीच कोटी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातून अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेता सैफ अली खान हे दोन मोठे कलाकार आमने सामने आलेले पाहायला मिळणार आहेत. ‘विक्रम वेधा’च्या टीझरचे प्रेक्षकांबरोबरच चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि दिग्गज मंडळींनीही कौतुक केले. यामध्ये विकी कौशल, अभिषेक बच्चन, करीना कपूर-खान, राकेश रोशन, सारा अली खान, आलिया भट्ट, झोया अख्तर, सोनाक्षी सिन्हा, वाणी कपूर, कतरिना कैफ, क्रिती सेनॉन, वरुण धवन, परिणीती चोप्रा, सुनिधी चौहान, तोरंज कायवॉन, नंदीश संधू, पुनित डी मल्होत्रा आणि इतर नामवंतांचा समावेश आहे.
गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने विक्रम वेधाह्ण हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठय़ा पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हृतिक रोशनने साकारलेल्या वेधच्या बदमाश अवतारापासून ते सैफ अली खानच्या विक्रम या पोलिसाच्या भूमिकेपर्यंत, चित्रपटाची प्रत्येक फ्रेम आकर्षक आणि मनोरंजक असल्याचे या टीझरमधून दिसून आले. मूळ दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता आर. माधवन आणि विजय सेतुपती या जोडीने गाजवला होता.