Abdu Rozik Arrested At Dubai Airport : ताजिक गायक आणि ‘बिग बॉस १६’, ‘लाफ्टर शेफ्स २’ शो स्टार अब्दू रोजिक याच्याबद्दल बातमी आहे.
अब्दू रोजिकला शनिवारी पोलिसांनी दुबई विमानतळावर चोरीच्या आरोपाखाली अटक केली. त्याच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, नेमकी कोणत्या गोष्टीची चोरी केल्याचा आरोप आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
अब्दू माँटेग्रो शहरातून शनिवारी पहाटे ५ वाजता दुबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्याला अटक केली. अब्दूच्या मॅनेजमेंट टीमने दुबईतील ‘खलीज टाइम्स’ या वृत्तपत्राशी बोलताना त्याच्या अटकेची पुष्टी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीत अब्दूवरील आरोपांचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी सांगितले की, सध्या आम्ही फक्त एवढेच सांगू शकतो की, अब्दूला चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु, त्यांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत त्याचे चाहते आता चिंतेत आहेत.
‘बिग बॉस १६’ मुळे फॉलोअर्स वाढले
अब्दू रोजिक ताजिकिस्तानचा रहिवासी असून सध्या तो 21 वर्षांचा आहे. अब्दू रोजिकने त्याच्या उंचीमुळे बरीच बातमी दिली. ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे त्याची उंची सुमारे तीन फूट आहे. तो पूर्वी व्हायरल म्युझिक कंटेंटवर काम करायचा; पण ‘बिग बॉस १६’मध्ये आल्यानंतर त्याचे फॉलोअर्स वाढले. सलमान खान सूत्रसंचालन करीत असलेल्या या रिअॅलिटी शोमध्ये अब्दूला भारतीय लोकांकडून खूप प्रेम मिळाले. बरेच लोक अब्दूला छोटा भाईजान म्हणूनही ओळखतात.
‘लाफ्टर शेफ्स २’ मध्ये सहभागी झाला होता
फक्त ‘बिग बॉस’च नाही तर अब्दू ‘लाफ्टर शेफ्स २’मध्येही दिसला आहे. या शोमध्ये त्याची जोडी यूट्यूबर एल्विश यादवबरोबर होती. त्याच्या अनोख्या शैलीने आणि एल्विश यादवबरोबरच्या त्याच्या केमिस्ट्रीने सर्वांची मने जिंकली. परंतु, काही काळानंतर अब्दूने रमजानमध्ये दुबईला जाण्याचे कारण देत शो मधेच सोडला. त्यानंतर त्याच्या जागी करण कुंद्राने शोमध्ये काम केले.
अब्दू रोजिकचे मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत असतात आणि चाहते त्याच्या प्रत्येक अदा वर फिदा असतात. मात्र, आता त्याच्या अटकेच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.